सुरुवातीचे पाचही सामने गमावल्यानंतर नैराश्याने खचून न जाता पुढे येणारा प्रत्येक सामना आम्ही अंतिम सामन्याप्रमाणेच खेळलो आणि हीच बाब आजचा विजय संपादित करण्यात महत्वाची ठरली, असे मत मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केले. सामन्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत रोहितने विजयाशी निगडीत विविध पैलूंवर संवाद साधला.
मोसमामध्ये सुरुवातीच्या काळात आम्हाला परभवाच्या मालिकेला सामारे जावे लागले होते. अशा वेळी संघाला एकत्र ठेवणे ही कर्णधाराची जबाबदारी असते. आमच्या संघात एकट्याच्या कौशल्यवार सामान्याचे स्वरुप बदलू शकतात, असे अनेक खेळाडू होते. फक्त या सगळ्यांचे कौशल्य एकत्र करुन खेळण्याची गरज होती. पुढील सामान्यांमध्ये आम्ही याच गोष्टीवर भर दिला आणि हा विजय साध्य करुन दाखविला, असे रोहितने सांगितले.
त्याचप्रमाणे हा विजय साध्य करण्यात मुंबई इंडियन्स संघाचा प्रशिक्षक रिकी पॉंटिंगचा मोठा वाटा असल्याचे मत रोहितने यावेळी व्यक्त केले. ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद भूषवताना आलेल्या अनुभवांचा तसेच त्याच्यामघ्ये असलेल्या कौशल्यांचा मुंबई इंडियन्सच्या विजयात सिंहाचा वाटा असल्याचे त्यांने सांगितले. संघाचे कर्णधारपद सांभाळण्याविषयी रिकी पॉंटिंगचे मार्गदर्शन अत्यंत फलदायी ठरल्याचे मत रोहितने व्यक्त केले. यावेळी सहायक कर्मचाऱय़ांबद्दल रोहितने कृतज्ञता व्यक्त केली.
संघातील सर्व खेळाडूंनी आपले कौशल्य प्रत्यक्षात उतरवून समोरील बलाढ्य संघांचे आव्हान पेलून दाखवले आहे. मालिका जिंकण्यासाठी अनेक लहान लहान गोष्टींवर वर्चस्व सिद्ध करावे लागते, नेमकी हीच गोष्ट आम्ही साध्य करुन दाखवली आणि या मालिकेत विजय संपादित केला, असे रोहितने सांगितले.