अंतिम फेरीत जरी आम्हाला ऑस्ट्रेलियाशी खेळावे लागले, तरी आम्ही कोणतेही दडपण न घेता त्यांना चिवट लढत देऊ, असे भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार सरदारा सिंग याने सांगितले.
‘‘नवी दिल्ली येथे २०१०मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताची ८-० अशी धूळधाण उडविली होती. या इतिहासाकडे आम्ही पाठ करीत आहोत व यंदाच्या लढतींवर लक्ष केंद्रित करीत आहोत. गेल्या चार वर्षांमध्ये आमच्या खेळात खूप सुधारणा झाली आहे. त्यामुळे कांगारूंचे आव्हान पेलविण्यासाठी आमची मानसिक तयारी झाली आहे,’’ असे सरदारा सिंगने सांगितले.
ऑस्ट्रेलियाच्या जेमी डायर याने अंतिम फेरीत भारतीय संघाबरोबर खेळायला आम्हाला आवडेल असे जाहीरपणे सांगितले होते. त्याविषयी सरदारा सिंग म्हणाला, ‘‘आम्हालाही अंतिम लढतीत ऑसी संघाशी खेळण्याची इच्छा आहे. सराव सामन्यात आम्ही इंग्लंडवर ३-२ असा विजय मिळविल्यामुळे आमच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. आमच्या संघातील समन्वय वाढला आहे. पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल करण्याबाबत असलेल्या उणिवा दूर करण्यावर आम्ही सराव शिबिरात भर दिला आहे.’’