*सचिनच्या शतकाने मुंबईकरांना दिला विश्वास
* सचिन आणि जाफरची शतके; मुंबई ३ बाद २७२
तीन पावलांवर असलेल्या चाळीसाव्या रणजी जेतेपदाचे स्वप्न साकारू शकते, असा विश्वास मुंबईच्या संघाला रविवारी सचिन तेंडुलकरने दिला. साखळी फेरीतील आठ सामन्यांत फक्त एकमेव विजय मिळविणाऱ्या मुंबईला अखेरच्या सामन्यांत जेमतेम बाद फेरी गाठण्यात यश मिळवता आले होते. पण आता निर्धास्त राहून चाहण्यासारखे नव्हते. नेमक्या याच वेळी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘मुंबई चालिसा’चे स्वप्न आवाक्यात आणण्याचे शिवधनुष्य उचलले. रविवारी सचिन आणि वसिम जाफर यांनी रणजी क्रिकेटमधील आपापली सलग दुसरी शतके साजरी केली आणि तिसऱ्या विकेटसाठी २३४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. याच बळावर मुंबईने रणजी उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या दिवशी ३ बाद २७२ अशी दमदार मजल मारली.
रणजी हंगामाच्या रेल्वेविरुद्धच्या पहिल्याच साखळी सामन्यात सचिन मुंबईसाठी खेळला होता. त्या सामन्यात सचिनने शतकही साकारले होते. त्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यावर प्रथमच मैदानावर परतलेला सचिन रणजी सामन्यात मात्र आत्मविश्वासाने खेळत होता. त्याने २९६ मिनिटे किल्ला लढवत २३३ चेंडूंत १० चौकार आणि एका षटकारासह आपली खेळी साकारली. त्याने केतूल पटेलला षटकार ठोकून अर्धशतक साजरे केले, तर अंबाती रायुडूला दोन धावा काढत आपले शतक पूर्ण केले. १०८ धावांवर असताना वहोराने त्याची डावी यष्टी भेदली आणि ही खेळी संपुष्टात आणली.
सचिनने वानखेडे स्टेडियमवर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ८०वे तर रणजी क्रिकेटमधील १८वे शतक साकारत ‘जीत जायेंगे हम, तू अगर संग है’ हा विश्वास तमाम मुंबईकरांना दिला. आता सुनील गावस्कर यांचे आणखी दोन विक्रम मोडण्याचा सचिनचा इरादा आहे. गावस्कर यांच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ८१ आणि रणजी क्रिकेटमध्ये २० शतके आहेत.
सचिनच्या शतकी खेळीला सुरेख साथ लाभली ती मुंबईचा अनुभवी रणजीपटू जाफरची. दिवसभर बडोद्याच्या गोलंदाजांचा सामना करीत चीनच्या भिंतीप्रमाणे उभा राहणारा जाफर दिवसअखेर १३७ धावांवर नाबाद राहिला. त्याने १६ चौकार आणि तीन षटकारांसह आपली खेळी फुलवली. चौकाराने शतक साजरे करणारा जाफर त्यानंतर अधिक आक्रमक जाणवला. तो ९६ धावांवर असताना गगनदीप सिंगच्या गोलंदाजीवर पहिल्या स्लिपमध्ये युसूफ पठाणने त्याला जीवदान दिले होते.
त्याआधी, नाणेफेक जिंकल्यावर मुंबईने प्रथम फलंदाजी स्वीकारली. परंतु कौस्तुभ पवार (८) आणि हिकेन शाह (९) लवकर बाद झाल्यामुळे मुंबईची २ बाद ३५ अशी अवस्था झाली.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ९० षटकांत ३ बाद २७२ (वसिम जाफर नाबाद १३७, सचिन तेंडुलकर १०८; मुर्तूजा वहोरा २/५०)