हरयाणातील एका लहान खेडेगावापासून अर्जुन पुरस्कारापर्यंत मजल मारणाऱ्या कुस्तीपटू बजरंग कुमारचा प्रवास हा नक्कीच प्रेरणादायी असाच आहे. आतापर्यंत राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धामध्ये त्याने रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम दाखवला असून आता त्याचे ध्येय या स्पर्धामध्ये सुवर्णपदकाला गवसणी घालण्याचे आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करायचे त्याचे स्वप्न असून त्याच्या पात्रता फेरीसाठी जोरदार तयारी सुरू केली असल्याचे बजरंग याने खास मुलाखतीमध्ये सांगितले. याचप्रमाणे त्याचा प्रवास, मिळालेले प्रोत्साहन, कुस्तीमध्ये झालेले बदल आणि कुस्तीच्या आगामी लीगबद्दल त्याने आपले मत व्यक्त केले.
> अर्जुन पुरस्कारासाठी तुझी शिफारस झाली, याबद्दल काय वाटतं?
नेहमीच माझ्यासाठी देश अग्रक्रमावर राहिला आहे. देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणे हे माझे भाग्य आहे. देशासाठी समर्पित होऊन खेळावे आणि जास्तीत जास्त पदके मिळवावीत, हाच माझा नेहमी प्रयत्न असतो. या पुरस्काराने माझ्या कामगिरीला गौरवण्यात आले आहे, माझ्यासाठी ही अत्युच्य आनंदाची बाब आहे. माझ्या देशाचा प्रत्येक पुरस्कार माझ्यासाठी अनमोल असाच आहे.
> २०१४च्या आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत तू रौप्यपदक पटकावले होतेस, आता तुझे ध्येय काय आहे?
नक्कीच सुवर्णपदक. रौप्यपदक जिंकून झाल्यावर आता कामगिरीत सुधारणा व्हायला हवी आणि त्यासाठी मी अथक मेहनत घेत आहे. जास्तीत जास्त सराव करण्यावर भर देत आहे. देशवासीयांच्या शुभेच्छांची जोड या प्रयत्नांना मिळाली तर नक्कीच सुवर्णपदकाचे ध्येय साकारता येईल. त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे माझे स्वप्न आहे आणि ते सत्यात उतरवण्यासाठी पात्रता फेरीत मला निकष पूर्ण करावे लागणार आहे. पात्रता फेरीत जिंकून ऑलिम्पिकचे दार ठोठावण्याचा माझा प्रयत्न असेल.
> तू सराव कसा करतोस?
पहाटे ३ वाजता उठून ४ ते ७ आणि संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत मी कुस्तीचा सराव करतो. त्याचबरोबर मानसिकरीत्या कणखर होण्यासाठी आणि तांत्रिकदृष्टय़ा सक्षम होण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो. तंत्रज्ञानाच्या विकासाचा आम्हालाही चांगला फायदा होतो. प्रतिस्पर्धी खेळाडूंचे व्हिडीओ आम्ही पाहतो आणि त्यानुसार त्याच्याविरुद्ध खेळण्याची रणनीती आखत असतो. त्याचे आणि माझे बलस्थान आणि कच्चे दुवे काय आहेत, यावर विचार करून त्यानुसार सराव केला जातो.
> सध्या कुस्ती जलद झाली आहे, त्याबद्दल काय वाटते?
पूर्वीपेक्षा आता कुस्ती नक्कीच जलद झाली आहे आणि त्याचा फायदा भारतीय खेळाडूंना नक्कीच होतो. कारण परदेशी खेळाडूंपेक्षा भारताच्या खेळाडूंची क्षमता जास्त असते, त्यामुळे त्यांना या जलद कुस्तीमध्ये जास्त दम लागत
नाही.
> एका लहान खेडय़ापासून अर्जुन पुरस्कारापर्यंतचा प्रवास कसा होता?
झज्जर या हरयाणातील तालुक्यामध्ये सहा वर्षांचा असल्यापासून मी कुस्ती खेळायला लागलो. छोटे खेडे असो किंवा एखादे मोठे शहर याचा खेळावर जास्त परिणाम होत नाही. लहान खेडय़ांमध्ये चांगले संस्कार होतात, मोठय़ाचा मान-सन्मान करणे शिकवणे जाते. सतपाल यांच्यासारखे चांगले गुरू मला मिळाले, त्याचबरोबर सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त या ऑलिम्पिकपटूंचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेले आणि त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. या दोघांनी मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या, मला प्रोत्साहन दिले. त्यांच्याकडून मला नेहमीच प्रेरणा मिळते. सरकारनेही वेळोवेळी चांगला पाठिंबा आणि प्रोत्साहन आम्हाला दिले आहे.
> आता कुस्तीमध्येही लीग येत आहे, याचा किती फायदा कुस्तीपटूंना होईल?
या लीगचा नक्कीच आम्हाला चांगला फायदा होईल, कारण या लीगमुळे विदेशातील खेळाडू येतील आणि त्यांच्याबरोबर खेळण्याची आम्हाला संधी मिळेल. नाही तर फक्त स्पर्धाच्या वेळी आम्ही त्यांच्याविरुद्ध खेळत असतो. या लीगमध्ये त्यांच्याबरोबर किंवा विरुद्ध खेळताना त्यांचे तंत्र शिकता येईल. कुस्तीमधील गोष्टींची चांगली देवाण-घेवाण आपल्याला या लीगच्या माध्यमातून पाहता येईल आणि त्याचा आमच्यासारख्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक पटकावण्यासाठी फायदा होईल.