४४-वर्धापनदिन विशेष अंक

आविष्कार देशमुख, अविनाश पाटील, तानाजी काळे, दिगंबर शिंदे, दयानंद लिपारे, सचिन कांकरिया, सतीश कामत, संतोष विणके

ग्रामविकासाची कहाणी
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
winners of patra chawl
पत्राचाळीतील ३०६ विजेत्यांची घरांची प्रतीक्षा संपेना, भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा प्रक्रियेस विलंब
Malpractices in the work of Rajarshi Shahu Udyan in Chinchwad
पिंपरी : चिंचवड येथील राजर्षी शाहू उद्यानाच्या कामात गैरव्यवहार

मुलींनी खेळायचे ते टिपरीपाणीसारखे नाजूक खेळ आणि मुलांनी खेळायचे ते अंगातली रग जिरवणारे खेळ ही पारंपरिक समजूत मुलींनी केव्हाच धुडकावून लावली आहे. अलीकडच्या आलेल्या ‘दंगल’ सिनेमाने ते अधोरेखित केलं इतकंच. म्हणूनच ‘लोकप्रभा’ने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या खेळांमधल्या ‘गीता-बबिता फोगट’चा शोध घेतला. त्यातून दिसलेलं चित्र निश्चितच आशादायी आहे. मुलींमध्ये क्रीडा क्षेत्रात पाय रोवून उभं राहण्याची इच्छा आहे, पालकांचं सहकार्यही आहे. आता गरज आहे ती क्रीडा संस्कृती विकसित होण्याची.

05-women-sportperson

आजही क्रीडा क्षेत्रातील कुस्ती, बॉक्सिंग, कबड्डी यांसारखे काही खेळ पुरुषी वर्चस्वाचे प्रतीक मानले जातात. इतर खेळांपेक्षा शारीरिक क्षमतेचा अधिक कस पाहणाऱ्या या खेळांमध्ये महिलांचे काय काम, असा प्रश्न आजही विचारला जातो. वेटलिफ्टिंग (भारोत्तोलन) कडेही त्याच दृष्टीने पाहिले जाते. कुस्ती, बॉक्सिंगमध्ये स्पर्धकाला एकमेकांशी लढावे लागते. प्रतिस्पध्र्याच्या ताकदीचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे आपले डावपेच ठरवावे लागतात. वेटलिफ्टिंगमध्ये मात्र स्वत:ला, स्वत:शी झुंजावे लागते. प्रतिस्पध्र्याशी थेट भिडावे लागत नसल्याचे समाधान देणाऱ्या या खेळात निर्णय आणि शारीरिक क्षमतेची कसोटी लागत असल्याने तन-मन तंदुरुस्त लागते. त्यामुळेच या खेळाच्या वाटेला जाण्यास पुरुष मंडळीही सहसा धजावत नसताना नाशिक जिल्ह्य़ातील मनमाडसारख्या ग्रामीण भागातील एखादी मुलगी राष्ट्रीय पातळीवर आपले नाव पोहोचविते, एप्रिलमध्ये बँकॉक येथे होणाऱ्या जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संभाव्य भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी तिची निवड होते, तेव्हा ती ‘मर्दानी’च ठरते.

आई-वडील शिक्षक, एक बहीण, भाऊ अभियांत्रिकीचा विद्यार्थी अशा सुशिक्षित; परंतु क्रीडा क्षेत्राची कोणतीही पाश्र्वभूमी नसलेल्या घरातील निकिता वाल्मीक काळे आज मनमाडची ओळख झाली आहे. मनमाडपासून १५ किलोमीटरवरील चोंढी (जळगाव) हे काळे परिवाराचे मूळ गाव. नोकरीनिमित्त ते मनमाडला स्थायिक झाले. सध्या छत्रे न्यू इंग्लिश विद्यालयात ११ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या निकिताने इयत्ता आठवीपासून वेटलिफ्टिंगचा सराव करण्यास सुरुवात केली. विशेष सुविधा नसताना आणि अतिशय लहानशा जागेत वेटलिफ्टिंगचा सराव करताना शहरी खेळाडूंप्रमाणे कोणतेही नखरे न करता हा खेळ आत्मसात करण्यासाठी जे जे शक्य ते सर्व करण्याचे तिने ठरविले. घरातूनही पाठबळ मिळाल्याने ती या पुरुषी खेळात रममाण झाली. खरे तर निकिताच्या कष्टाला जितकी दाद द्यावी, त्यापेक्षाही अधिक तिच्या आई-वडिलांना द्यावी लागेल. समाज पुढारल्याच्या कितीही गप्पा मारल्या जात असल्या तरी आजही एखाद्या मुलीने चाकोरीच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केल्यास घरातूनच पहिली अडवणूक होण्यास सुरुवात होते. त्यात वेटलिफ्टिंगसारख्या खेळाच्या सरावासाठी मुलीला पाठविणे आणि तिच्यामागे खंबीरपणे उभे राहणे ही निश्चितच कौतुकास्पद गोष्ट म्हणावी लागेल. बरोबरीच्या इतर मुली चमचा-लिंबू, कॅरम यांसारखे नाजूक खेळ खेळत असताना निकिता मात्र वेटलिफ्टिंगसारख्या दणकट खेळात आपल्या शारीरिक आणि मानसिक ताकदीचा कस पाहू लागली. दररोज सकाळचे आणि सायंकाळचे दोन तास तिने केवळ वेटलिफ्टिंगच्या नावे केले. या कष्टाचे फळ लवकरच तिला मिळाले. प्रथम जिल्हा आणि नंतर राज्य स्तरावर तिच्या नावापुढे पदक लागण्यास सुरुवात झाली. सलग तीन वर्षांपासून राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिने सुवर्ण मिळविले आहे.

कविता राऊत, मोनिका आथरे, संजीवनी जाधव, किसन तडवी यांसारख्या दर्जेदार धावपटूंमुळे नाशिकचे नाव अॅिथलेटिक्समध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले असताना अॅिथलेटिक्सपेक्षा भिन्न खेळातही नाशिकच्या मुली आता मागे नसल्याचे निकिताने दाखवून दिले आहे. राष्ट्रीय स्तरावर अभिमान वाटावा अशी कामगिरी करूनही तिने त्याचा कधीही गवगवा केला नाही. अजून आपणास भरपूर मोठा पल्ला गाठायचाय याची जाणीव तिला आहे.

डिसेंबर २०१६ मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या युवा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत निकिताने सुवर्ण आणि कांस्य अशी कमाई केली. या कामगिरीची दखल घेऊन पतियाळा येथे आयोजित संभाव्य भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी तिची निवड झाली. भारताची ऑलिम्पियन वेटलिफ्टर कुंजुराणी देवी यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या निकिताचा सराव सुरू आहे.

पाच राज्यस्तरीय शालेय स्पर्धामध्ये पाच सुवर्ण, युवा अजिंक्यपद स्पर्धेत तीन सुवर्ण अशी सुवर्णमयी झळाळी लाभलेली तिची कारकीर्द आहे. कोणत्याही क्रीडापटूला त्याच्या खेळानुसार आहार आणि व्यायामाचे नियोजन करावे लागते. मुळात वेटलिफ्टिंग सर्व वजनाचा खेळ. निव्वळ आडव्या बारचेच वजन १५ किलो. हे वजन उचलून बारला लावण्यात येणारे अतिरिक्त वजन उचलण्यासाठी स्नायू बळकट असणे गरजेचे ठरते. त्यामुळेच खेळाडूची शारीरिक मजबुती आणि आत्मविश्वास महत्त्वाचा ठरतो. निकिताच्या आहारातही स्नायूंच्या बळकटीकरणासाठी बदल करण्यात आला. मांसाहारासह फळे, ड्रायफ्रूट यांचे प्रमाण वाढविण्यात आले. निकिताला वाचन आणि डोंगरदऱ्या फिरण्याचीही आवड आहे. खेळाप्रमाणेच अभ्यासातही तिची कामगिरी वजनदार आहे. दहावीच्या परीक्षेत मिळालेले ८७ टक्के गुण त्याची साक्ष देतात. निकिताची खेळातील प्रगती पाहून आई-वडीलही आनंदी असून तिने या खेळात शिखर गाठावे अशीच त्यांची इच्छा आहे.
निकिताच्या आजपर्यंतच्या यशामागे तिचे प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे योगदान महत्त्वाचे आहे. आडनाव व्यवहारे असले तरी मनमाडमध्ये वेटलिफ्टिंगचा वर्ग सुरू करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा व्यवहार पाहिला नाही. त्यामुळेच सध्या त्यांच्याकडे २५ मुली आणि १५ मुले सराव करीत असली तरी गुरू-शिष्याच्या नात्यात त्यांनी कोणताही व्यवहार येऊ दिलेला नाही. वेटलिफ्िंटगमध्ये सरावासाठी येणारी मुले सर्वसामान्य घरांतील आहेत. आर्थिक जुळवाजुळव करताना या मुलांच्या कुटुंबाची होत असलेली ओढाताण त्यांना चांगलीच माहीत आहे. अशा स्थितीत त्यांच्याकडून आर्थिक अपेक्षा करणे व्यवहारे यांना पटत नाही. आपल्याकडे येणाऱ्या खेळाडूंची परिस्थिती समजून घेण्याची त्यांची ही हातोटीच खेळाडूंना अधिकाधिक चांगली कामगिरी करण्यास प्रोत्साहित करते. निकिताच्या आजच्या यशामागेही हेच कारण आहे. ६३ नंतर ६९ किलो वजनी गटात सहभाग घेणारी निकिता ६८ किलो ‘स्नॅच’ आणि ८७ किलो ‘क्लिन अँड जर्क’पर्यंत वजन पेलू शकते. पतियाळा येथे सुरू असलेल्या सरावादरम्यान तिच्या कामगिरीत दिवसेंदिवस सुधारणा होत असून अलीकडेच झालेल्या चाचणीत ७५ किलो स्नॅच आणि ८८ किलो क्लिन अँड जर्क अशी नोंद तिने केली आहे.

निकिताच्या कामगिरीवर आनंदित असलेले प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांना निकिताने ऑलिम्पिकपर्यंत मजल मारावी अशी इच्छा आहे. निकितामध्ये निश्चितच तशी क्षमता असल्याचा आत्मविश्वासही त्यांना आहे. शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या महाराष्ट्राचे प्रशिक्षकपदही व्यवहारे यांच्याकडेच होते. महाराष्ट्राच्या या संघात सातपैकी चार मुली नाशिकच्या होत्या. यावरून व्यवहारे यांच्या प्रशिक्षणाची कमाल लक्षात येईल. २०१०-११ या एकाच वर्षांत व्यवहारे यांच्या नऊ खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरापर्यंत धडक दिली होती. व्यवहारे यांच्या शिष्यांकडून त्यामुळेच अधिक अपेक्षा बाळगण्यात येत आहेत. मळलेली वाट सोडून इतर अनेक क्षेत्रे मुलींना कारकीर्दीसाठी खुणावत असली तरी चौकट मोडण्यासाठी हिंमत लागते. मुलींना ही हिंमत आणि पाठबळ देण्याचे काम व्यवहारे करीत असल्याने त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी निकितासारख्या इतर मुलीही धडपड करीत आहेत. मुलींना आत्मविश्वास देता येत नसेल तर किमान त्यांना नाउमेद करू नका, अडवू नका, मग बघा त्या किती उंच भरारी घेतात ते! निकिताने घेतलेली झेप तरी हेच सांगते.
अविनाश पाटील – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा