वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यानंतर रवी शास्त्री-सुधीर नाईक यांच्यातील वादावर मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) एकसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. भारताचे माजी कर्णधार आणि एमसीएचे उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ५ नोव्हेंबरला होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये वेंगसरकर यांच्याकडून याप्रकरणी अहवाल सादर करणार आहे. मात्र वेंगसरकर या प्रकरणाचा पंचनामा कसा करणार, याची चर्चा क्रिकेट वर्तुळामध्ये आहे.

‘‘नाईक यांनी आम्हाला वानखेडेवर घडलेल्या घटनेबद्दल सांगितले. ही गोष्ट दुर्भाग्यपूर्ण आहे. हे दोघेही मुंबईचे माजी खेळाडू आहेत. त्यामुळे आम्ही यांच्यातील वादविवादावर तोडगा काढण्याची जबाबदारी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि एमसीएचे उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांच्यावर सोपवली आहे. ते या दोन्ही व्यक्तींशी चर्चा करून पाच नोव्हेंबरला होणाऱ्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. त्यानंतर या अहवालावर चर्चा करून कार्यकारिणी समिती योग्य तो निर्णय घेईल,’’ असे एमसीएचे उपाध्यक्ष आशीष शेलार यांनी सांगितले.
भारत-दक्षिण आफ्रिकेमधील पाचवा एकदिवसीय सामना वानखेडेवर खेळवण्यात आला होता. या वेळी प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने ४३८ धावांचा डोंगर उभारला होता. या सामन्यातील खेळपट्टीबाबत कोणतेही भाष्य करण्यास शेलार यांनी नकार दिला. ‘‘या खेळपट्टीवर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशांमधला सामना झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि बीसीसीआय यांच्या अखत्यारीतील ही गोष्ट आहे. त्यामुळे या संदर्भात कोणतीही टिप्पणी करणे उचित ठरणार नाही,’’ असे शेलार म्हणाले.
मुंबई टी-२० लीगबाबत सकारात्मक चर्चा या बैठकीमध्ये झाली असून ही लीग दोन टप्प्यांमध्ये खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबतची पुढील चर्चा ५ नोव्हेंबरला होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) परवानगीची आवश्यकता असेल.

शास्त्री- नाईक वादावर एमसीएची एकसदस्यीय समिती

सुधीर नाईक यांचे बीसीसीआयला पत्र
’भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी केलेल्या असभ्य वर्तणुकीबाबत वानखेडेचे क्युरेटर सुधीर नाईक यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी शास्त्री आणि अरुण यांना समज द्यावी, असे म्हटले आहे.
’वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्ध पाचव्या एकदिवसीय सामन्यात खेळताना दक्षिण आफ्रिकेने ४३८ धावांचा डोंगर उभारला होता. ‘‘आफ्रिकेच्या फलंदाजीनंतर शास्त्री यांनी ‘चांगली खेळपट्टी बनवली’ असे म्हटले आणि त्यानंतर त्यांनी मराठीत शिवीगाळ केली. अरुण यांनी माझ्या सहाय्यकांवर अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. मी व्यवस्थापनाला विचारू इच्छितो की, माझ्या सहाय्यकांना जाब विचारणारे भरत अरुण कोण आहेत? त्यांचे काम हे गोलंदाजांना प्रशिक्षण देणे एवढेच आहे. मी बीसीसीआयला विनंती करतो की, त्यांनी या दोघांनाही समज द्यावी,’’ असे नाईक यांनी पत्रामध्ये लिहिले आहे.