इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी बळी घेण्याचा मान शनिवारी जेम्स अँडरसन (३८४) याने मिळवला असला तरी या विक्रमावर वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरने विरजण घातले.
होल्डरने परिपक्व खेळाचा नजराणा पेश करून कारकीर्दीतले पहिले कसोटी शतक झळकावले आणि वेस्ट इंडिजचा पराभव टाळला. होल्डरच्या या शतकामुळे इंग्लंडच्या तोंडाशी आलेला विजयाचा घास निसटला आणि त्यांना पहिल्या कसोटीत अनिर्णित निकालावर समाधान मानावे लागले.
पहिल्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी ४३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने ७ बाद ३५० धावांचा पल्ला गाठला. यात होल्डरचा महत्त्वाचा वाटा होता. त्याने जवळपास चार तास फलंदाजी करून १४९ चेंडूंत १५ चौकारांसह नाबाद १०३ धावांची खेळी केली. ६ बाद १८९ धावा अशा दयनीय अवस्थेत असलेल्या वेस्ट इंडिजचा संघ पराभूत होण्याची चिन्हे दिसत होती, परंतु होल्डरच्या शतकाने हा पराभव टळला.