वेस्ट इंडिज प्लेअर्स असोसिएशन आणि वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ यांच्याशी खेळाडूंनी सकारात्मक आणि खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली असून, लवकरच याबाबत तोडगा निघेल अशी चिन्हे दिसत आहेत. मंगळवारी सायंकाळी ही तात्कालिन बैठक आयोजित करण्यात आली होती.
‘‘आर्थिक वाद विकोपाला गेल्यामुळे वेस्ट इंडिज संघाने भारत दौरा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला. याबाबत बैठकीत गांभीर्याने चर्चा झाली. अतिशय मैत्रीपूर्ण, खेळीमेळीच्या आणि सकारात्मक वातावरणात ही बैठक झाली,’’ असे वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मंडळाचे अध्यक्ष डेव्ह कॅमेरून, संचालक डॉन वेहबी, ल्युक हॅमेल-सिमथ, वेस्ट इंडिज प्लेअर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वॉव्हेल हाइंड्स, सचिव वेन लुइस आणि पॅट्रिक फॉरेस्ट ही मंडळी  या बैठकीला हजर होती.