बलाढ्य इंग्लंडवर हेडिंग्लेच्या मैदानात ५ गडी राखून मात करत वेस्ट इंडिजने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन दिली आहे. तब्बल १७ वर्षांनी इंग्लंडच्या मैदानावर वेस्ट इंडिजला कसोटी सामना जिंकता आला आहे. इंग्लंडने दिलेल्या ३२२ धावांचा पाठलाग करताना शाई होप आणि क्रेग ब्रेथवेटने झुंजार खेळी केली. शाई होपने नाबाद १२० धावांची शतकी खेळी केली, तर ब्रेथवेटने त्याला ९२ धावा काढत चांगली साथ दिली. सध्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजने १-१ अशी बरोबरी साधलेली आहे. शतकी खेळी करुन वेस्ट इंडिजला विजय मिळवून देणाऱ्या शाई होपला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.

नाणेफेक जिंकत इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी केली, मात्र हा निर्णय त्यांच्यावर चांगलाच उलटला. पहिल्या डावात अवघ्या २५८ धावांवर इंग्लडचा संघ गारद झाला. याचा फायदा घेत वेस्ट इंडिजच्या संघाने पहिल्या डावात ४२७ धावांचा डोंगर उभा केला. मात्र दुसऱ्या डावात इंग्लंडने सामन्यात जोरदार पुनरागमन करत, वेस्ट इंडिजला विजयासाठी ३२२ धावांचं आव्हान दिलं. पहिल्या कसोटीतली वेस्ट इंडिजची कामगिरी पाहता या कसोटीतही विंडिजचा संघ गडगडणार असंच सर्वांना वाटलं होतं.

मात्र वेस्ट इंडिजने आपल्या दुसऱ्या डावाची अतिशय सावधरितीने सुरुवात करत, सामन्यामध्ये आपलं आव्हानं कायम राखलं. कायरन पॉवेल आणि कायले होप हे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर, शाई होप आणि क्रेग ब्रेथवेटने १४४ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळेच वेस्ट इंडिजला इंग्लंडवर विजय मिळवणं सोपं झालं.

दुसऱ्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांना आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. इंग्लंडच्या अनेक खेळाडूंनी सामन्यात सोपे झेल सोडले, यामुळे वेस्ट इंडिजच्या दोन्ही फलंदाजांना मोठ्या धावसंख्या करता आल्या. सध्या या मालिकेत वेस्ट इंडिजने १-१ अशी बरोबरी साधली असून, या मालिकेतला अखेरचा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.