आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘मिनी वर्ल्डकप’ म्हणून ओळखल्या जाणाऱया ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी’ स्पर्धेसाठीच्या अंतिम आठ संघांत स्थान मिळविण्यात वेस्ट इंडिज संघाला अपयश आले आहे. त्यामुळे २०१७ साली इंग्लंडमध्ये होणाऱया आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला वेस्ट इंडिजच्या संघाला मुकावे लागणार आहे. आयसीसीकडून बुधवारी एकदिवसीय संघांची क्रमवारी जाहीर करण्यात आली. या क्रमवारीत वेस्ट इंडिजला ८८ गुणांसह नवव्या स्थानी समाधान मानावे लागले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पात्रता नियमानुसार आयसीसी क्रमवारीतील पहिल्या आठ संघांना या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते. पण वेस्ट इंडिजची क्रमवारीत नवव्या स्थानी घसरण झाल्यामुळे कॅरेबियन खेळाडूंची पुरती निराशा झाली आहे. तर, बांग्लादेशने यंदा  स्पर्धेसाठीचे आपले स्थान पक्के केले आहे. बांग्लादेश आयसीसी क्रमवारीत ९६ गुणांसह सातव्या स्थानी आहे. २००६ नंतर पहिल्यांदाच बांग्लादेशच्या संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्याची संधी मिळणार आहे.
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २०१७ चे यजमानपद इंग्लंडला मिळाले असून या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझिलंड, श्रीलंका, इंग्लंड, बांग्लादेश आणि पाकिस्तान संघ खेळणार आहेत.

आयसीसीची एकदिवसीय संघांची क्रमवारी-
ऑस्ट्रेलिया- १२७ गुण, भारत- ११५ गुण, दक्षिण आफ्रिका- ११० गुण, न्यूझिलंड १०९ गुण, श्रीलंका- १०३ गुण, इंग्लंड १०० गुण, बांग्लादेश- ९६ गुण, पाकिस्तान- ९० गुण, वेस्ट इंडिज- ८८ गुण, आयर्लंड- ४९ गुण, झिम्बाब्वे- ४५ गुण, अफगाणिस्तान- ४१ गुण.
(यातील पहिले आठ संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरविले जातात)