कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सातव्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा नावावर असलेला वेस्ट इंडिजचा अनुभवी फलंदाज शिवनारायण चंदरपॉलने २२ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला शुक्रवारी अलविदा केला.

गयानाच्या ४१ वर्षीय चंदरपॉलच्या खात्यावर ११,८६७ धावा जमा आहेत. वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम नावावर असलेल्या ब्रायन लारापासून तो फक्त ८६ धावांच्या अंतरावर होता. चंदरपॉलने मार्च १९९४मध्ये इंग्लंडविरुद्ध गयाना येथे पदार्पण केले. तो सामना वेस्ट इंडिजने एक डाव आणि ४४ धावांनी जिंकला होता. चंदरपॉलचे त्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते. मागील वर्षी बार्बाडोस येथे मे महिन्यात तो अखेरचा कसोटी सामनासुद्धा इंग्लंडविरुद्धच खेळला. विंडीजने पाच विकेट्स राखून तो सामना जिंकत तीन कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत सोडवली होती. शेवटच्या दहा कसोटी डावांमध्ये त्याला फक्त एकदा अर्धशतक साकारता आले आहे. चंदरपॉलने विंडीजचे कर्णधारपदसुद्धा सांभाळले आहे.