मानधनासंदर्भातील वाद विकोपाला गेल्यामुळे वेस्ट इंडिज संघावर उर्वरित सामने रद्द करून भारत दौरा गुंडाळण्याची नामुष्की ओढवली आहे. विंडीजने दौरा अर्धवट सोडल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केली आहे. दरम्यान, धूर्त बीसीसीआयने श्रीलंका क्रिकेट मंडळाशी बोलणी करून त्यांना पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आमंत्रित केले आहे.
आर्थिक प्रश्नावर झगडणाऱ्या कॅरेबियन संघाचे कोचीतील पहिल्या सामन्यापासून बिनसले होते. चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याआधी हे प्रकरणी आणखी पेटले. त्यामुळे हा सामनासुद्धा रद्द होण्याची शक्यता होती. परंतु बीसीसीआयचे संयुक्त सचिव अनुराग ठाकूर यांच्या मध्यस्थीमुळे ते खेळण्यासाठी राजी झाले. पण या सामन्यानंतर दौऱ्यातील उर्वरित सामने आम्ही खेळणार नाही, हा आपला निर्णय विंडीजच्या खेळाडूंनी बीसीसीआयला कळवला.
‘‘मानधनाच्या वादामुळे चौथ्या एकदिवसीय सामन्यानंतरचा उर्वरित भारत दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने (डब्ल्यूआयसीबी) बीसीसीआयला दिली. त्यामुळे विंडीज संघातील खेळाडू सामन्यानंतर त्वरित मायदेशी परततील,’’ असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले.
‘‘खेळाडूंमधील अंतर्गत वादामुळे हा पेचप्रसंग उद्भवला, असे वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने म्हटले आहे. आता डब्ल्यूआयसीबीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, याकरिता बीसीसीआय आयसीसीकडे दाद मागणार आहे. दौरा अर्धवट सोडून गेल्यामुळे झालेली आर्थिक हानी भरून द्यावी, असा दावा बीसीसीआय करणार आहे. आम्ही दौऱ्याच्या प्रारंभीपासून त्यांच्याशी सहकार्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे या घटनेकडे आम्ही गांभीर्याने पाहत आहोत,’’ असे पटेल पुढे म्हणाले.
‘‘वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाच्या निर्णयामुळे आम्हाला धक्का बसला आहे आणि अतिशय निराशसुद्धा झालो आहोत. मंडळाला खेळाडूंच्या संदर्भातील प्रश्न सोडवण्यात अपयश आल्यामुळे सध्या सुरू असलेल्या मालिकेवर त्याचे परिणाम झाले आहे. विंडीज संघाने भारतातून परतण्याचा निर्णय घेतल्यामुळे भविष्यातील मालिका, खेळाडू तसेच बीसीसीआयशी असलेल्या संबंधांवर त्याचा परिणाम होऊ शकेल,’’ असे बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने वैयक्तिकपणे दौरा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु दौरा पूर्ण करून बांधीलकी जपावी, अशी विनंती आम्ही त्यांना अनेकदा केली होती, असे स्पष्टीकरण बीसीसीआयने भारतीय क्रिकेटरसिकांना दिले आहे.
‘‘बीसीसीआयकडे आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत. आयसीसीने या घटनेची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी. जेणेकरून खेळाची प्रतिमा डागाळणाऱ्या अशा घटना भविष्यात घडणार नाहीत,’’ असे बीसीसीआयने नमूद केले आहे.
हाइंड्सच्या विश्वासघातामुळे वाद पेटला!
वेस्ट इंडिजच्या संघाला भारतात पोहोचल्यावर नवा कराराचा मसुदा देण्यात आला होता. नव्या करारानुसार त्यांच्या कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामन्यासाठी मिळणाऱ्या मानधनात ७५ टक्के कपात झाली होती. मात्र वेस्ट इंडिज प्लेअर्स असोसिएशनचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी वॉव्हेल हाइंड्स यांनी खेळाडूंशी सल्लामसलत न करताच वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाच्या कराराच्या मसुद्यावर स्वाक्षरी केली होती. त्यामुळे हाइंड्स यांनी विश्वासघात केल्याचा दावा खेळाडू करीत होते. कोचीतील पहिल्या एकदिवसीय सामन्यांच्या पूर्वसंध्येला कराराच्या मुद्दय़ावरून विंडीजच्या खेळाडूंनी सामन्यावर बहिष्काराची धमकी दिली होती. परंतु नंतर खेळाडूंनी सामना खेळण्याचा निर्णय घेताना आम्ही करार स्वीकारल्याची समजूत करून घेऊ नये, असा इशारा दिला होता. विंडीजचा कर्णधार ड्वेन ब्राव्हाने हाइंड्स यांना लिहिलेल्या पत्रात कराराचे मुद्दे स्वीकारार्ह नाहीत, असे म्हटले होते.
कसोटी मालिकेसह पाच सामने रद्द
वेस्ट इंडिजचा संघ कोलकाता येथे सोमवारी पाचवा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळणार होता, त्यानंतर २२ ऑक्टोबरला कटक येथे एकमेव ट्वेन्टी-२० सामना होणार होता. मग तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादला (३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर), दुसरा सामना बंगळुरूला (७ ते ११ नोव्हेंबर) आणि तिसरा सामना अहमदाबादला (१५ ते १९ नोव्हेंबर) होणार होता.
विश्वचषकासाठी एकदिवसीय मालिकेला प्राधान्य : बीसीसीआय
विंडीज क्रिकेट संघाच्या माघारीच्या निर्णयानंतर तासाभरातच बीसीसीआयच्या घडामोडींना वेग आला. बीसीसीआयने नोव्हेंबर महिन्यातील पोकळी भरून काढण्यासाठी आपली ताकद पणाला लावून १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत श्रीलंकेला पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी तयार केले आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दृष्टीने आम्ही कसोटी मालिकेऐवजी एकदिवसीय मालिकेला प्राधान्य दिले, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
डिसेंबर महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे उपलब्ध कालावधीचा विचार करून विश्वचषक स्पध्रेचा विचार करून एकदिवसीय मालिका आयोजनाचा निर्णय घेण्यात आला. येत्या काही दिवसांत श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर होईल. कोलकाता, कटक, हैदराबाद, बंगळुरू आणि अहमदाबादला हे सामने होण्याची शक्यता आहे.