मधली फळी ढासळल्यावरही खंबीरपणे लढा देत वेस्ट इंडिजने बार्बाडोसमधील दुसरा ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामना जिंकला आणि इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेवर २-० असे विजयी प्रभुत्व प्रस्थापित केले. जॉस बटलरच्या ६७ धावांच्या खेळीच्या बळावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने ७ बाद १५२ धावा केल्या. फिरकी गोलंदाज सुनील नरिनला दुखापत झाल्यामुळे डावखुरा फिरकी गोलंदाज क्रिश्मर सॅन्टोकीला संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने करताना २१ धावांत ४ बळी घेतले आणि सामनावीर किताब पटकावला. १५व्या षटकात २ बाद १११ अशा सुस्थितीत असलेल्या वेस्ट इंडिजचे तीन फलंदाज फक्त पाच धावांच्या मोबदल्यात बाद झाले. परंतु कर्णधार डॅरेन सॅमीने फक्त ९ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ३० धावा काढत संघाला ७ चेंडू राखून विजय मिळवून दिला.