कसोटी मालिकेत विंडीजला त्यांच्याच भूमीवर पराभूत केल्यानंतर भारतीय संघ आता ट्वेन्टी-२० मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. पाचदिवसीय क्रिकेटनंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ कशी कामगिरी करणार, याकडे क्रिकेटचाहत्यांचे लक्ष लागले आहे. या सामन्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा सामना अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क मैदानावर खेळवण्यात येणार आहे. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात इतर खेळांच्या तुलनेत क्रिकेटचा प्रेक्षकवर्ग मर्यादित आहे. मात्र, भारत-वेस्ट इंडिजच्या सामन्याच्यानिमित्ताने अमेरिकेत क्रिकेटची  मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. क्रिकेटसाठी खास तयार करण्यात आलेल्या मैदानावर ही लढत रंगेल. सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क हे एकदिवसीय क्रिकेटच्या दर्जाचे एकमेव आयसीसी प्रमाणित स्टेडियम अमेरिकेत उपलब्ध आहे. याच ठिकाणी गेल्या महिन्यात सहा कॅरेबियन प्रीमियर लीगचे सामनेसुद्धा झाले होते. या सामन्यामुळे आता अमेरिकेची बाजारपेठ क्रिकेटसाठी खुली होणार आहे.
या सामन्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यानिमित्ताने भारतीय संघाची धुरा पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीच्या हाती येणार आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नव्याने नियुक्ती झालेले अनिल कुंबळे आणि महेंद्रसिंग धोनी या सामन्याच्यानिमित्ताने प्रथमच एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे या दोन्ही खेळाडुंच्या अनुभवाचा फायदा भारताला कितपत होणार, याची उत्सुकता तमाम क्रिकेटप्रेमींना लागली आहे.  ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला वेस्ट इंडिजकडून पराभव स्विकारावा लागला होता. या सामन्यामध्ये कार्लोस ब्रेथवेटने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच कार्लोस ब्रेथवेटकडे भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. त्यामुळे भारत विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढणार की विंडीजचा संघ ट्वेन्टी-२० प्रकारात भारताला पुन्हा एकदा नमवणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल. भारतीय संघाच्या कामगिरीची उत्सुकता चाहत्यांना असल्यामुळे प्रत्येक सामन्याला सरासरी १५ हजार क्रिकेट रसिक हजेरी लावण्याची शक्यता आहे.

भारत आणि वेस्ट इंडिजचा यांच्यातील सामना अमेरिकेत कधी खेळला जाणार?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अनुक्रमे २७ आणि २८ ऑगस्ट या दिवशी फ्लोरिडा (अमेरिका) येथे सामने होणार आहेत. हे सामने क्रिकेटसाठीच खास तयार करण्यात आलेल्या फ्लोरिडातील सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क मैदानावर होणार आहे. यानिमित्ताने अमेरिकासारख्या प्रगत राष्ट्रात शुक्रवारी या खेळाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेन्टी-२० सामन्याला सुरूवात कधी होणार?

भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी ७.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे.

भारत वि. वेस्ट इंडिज सामना कोणत्या चॅनेल्सवर पाहता येणार?

स्टार स्पोर्टस १, स्टार स्पोर्टस एचडी १, स्टार स्पोर्टस ३, स्टार स्पोर्टस एचडी ३ या चॅनेल्सवर भारत वि. वेस्ट इंडिजची लढत पाहता येईल.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेन्टी-२० लढतीचे ऑनलाईन स्ट्रिमिंग कुठे पाहता येईल?

या लढतीचे लाईव्ह स्ट्रिमिंग यप टिव्हीवर (YuppTV) पाहता येईल. स्मार्ट टिव्ही, स्मार्ट ब्ल्यू-रे प्लेयर्स, लॅपटॉप, गेमिंग कन्सोल्स, स्ट्रिमिंग मिडीया प्लेअर्स, स्मार्टफोन, टॅबलेटस् या इंटनरनेट सुविधा उपलब्ध असणाऱ्या उपकरणांच्या माध्यमातून यप टिव्हीवरचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येईल.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेन्टी-२० लढतीचे वैशिष्ट्य काय?

या लढतीच्यानिमित्ताने भारतीय संघ पहिल्यांदाच अमेरिकेच्या भूमीवर खेळणार आहे. हा सामना क्रिकेटसाठीच खास तयार करण्यात आलेल्या फ्लोरिडातील सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क मैदानावर होणार आहे. यानिमित्ताने अमेरिकासारख्या प्रगत राष्ट्रात शुक्रवारी या खेळाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. या मालिकेतील दोन्ही सामन्यात पराभूत झाल्यास एमआरएफ टायर्स आयसीसी ट्वेन्टी-२० क्रमवारीमधील संघांच्या यादीतील दुसरे स्थान त्यांना गमवावे लागणार आहे.