देशविदेशातील दिग्गज क्रिकेटपटू, षटकार – चौकारांची बरसात आणि कलाकारांची मांदियाळी म्हणजे आयपीएल. इंडियन प्रिमिअर लीगचे यंदाचे १० वे पर्व असून ५ एप्रिलपासून आयपीएलला सुरुवात होणार असून आयपीएलमध्ये सर्वांनाच उत्सुकता असते ती लिलाव प्रक्रियेची. सोमवारी आयपीएलच्या १० व्या पर्वासाठी खेळाडूंची बोली लागणार आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर अल्पावधीत नाव कमावणारी स्पर्धा म्हणजे इंडियन प्रिमिअर लीग. या लीगने भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनाही भरघोस कमाई करुन दिली. या स्पर्धेत मिळणारा अनुभव आणि मानधन पाहता या स्पर्धेत खेळण्यासाठी इच्छुक क्रिकेटपटूंची यादी मोठी असते. या खेळाडूंवर संघमालक बोली लावतात. यंदाच्या लिलाव प्रक्रियेसाठी तब्बल ७५० खेळाडूंनी आपले नाव नोंदवले होते. आठ संघमालकांनी यातील अंतिम ३५१ खेळाडूंची यादी निश्चित केली. इशांक जग्गी याला शेवटी स्थान मिळाल्याने आता लिलाव प्रक्रियेत एकूण ३५२ खेळाडूंवर बोली लागणार आहे. विशेष म्हणजे मॅच फिक्सिंगसारख्या प्रकरणानंतरही आयपीएलची लोकप्रियता कमी झाली नाही हे यातून स्पष्ट होते.

कधी आणि कुठे होणार आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव ?

आयपीएलच्या दहाव्या हंगामासाठी ३५२ खेळाडूंवर बोली लागणार आहे. २० फेब्रुवारी (सोमवारी) ही लिलावप्रक्रिया पार पडणार आहे. बंगळुरुतील रिट्झ कार्लटन हॉटेलमध्ये ही लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.

लिलाव प्रक्रियेची वेळ ?

२० फेब्रुवारीरोजी सकाळी नऊ वाजल्यापासून आयपीएलसाठीची लिलाव प्रक्रिया सुरु होईल.

कुठे बघता येणार लिलाव ?

सॉनी सिक्स आणि सॉनी सिक्स एचडी या वाहिन्यांवर सकाळी नऊ वाजल्यावर लिलाव प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

किती भारतीय खेळाडूंवर लागणार बोली ?

आयपीएलच्या दहाव्या हंगामातील ३५२ खेळाडूंपैकी २३१ भारतीय खेळाडू आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंमध्ये आयसीसीमध्ये असोसिएट सदस्य असलेल्या देशांमधील सहा क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

आयपीएल १० च्या लिलाव प्रक्रियेचे वैशिष्ट्य काय ?

आयपीएलच्या हंगामातील हे १० वे आणि शेवटचे वर्ष आहे. २०१८ मधील लिलाव प्रक्रियेत सर्व खेळाडूंना लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे लागणार आहे. आयपीएलच्या अकराव्या पर्वात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघांची वापसीदेखील होऊ शकते. त्यामुळे यंदाच्या शेवटच्या हंगामासाठी संघमालक लिलाव प्रक्रियेवर जास्त पैसे खर्च करणार नाही अशी शक्यता आहे.

कसा होतो खेळाडूंचा लिलाव ?

लिलाव प्रक्रिया सुरु असलेल्या सभागृहात आठ संघाचे मालक, मेंटॉर, प्रशिक्षक बसलेले असतात. प्रत्येक खेळाडूच्या नावाची घोषणा केली जाते. जर एखाद्या संघ मालकाला तो खेळाडू आपल्या संघात हवा असल्यास तो प्रशिक्षकांशी चर्चा करुन खेळाडूवर बोली लावतो. जो सर्वाधिक बोली लावेल त्या संघात त्या क्रिकेटपटूचा समावेश होतो.

कोणत्या खेळाडूंवर लागेल सर्वात जास्त बोली लागण्याची शक्यता ?

भारतीय क्रिकेटपटूंमध्ये दिनेश कार्तिक, करुण नायर, संजीव सॅमसन, शार्दूल ठाकूर, परवेझ रसूल, हार्दिक पांड्या तर आंतरराष्ट्रीय स्तरावर बेन स्ट्रोक्स, जो रुट, डेव्हिड वॉर्नर या खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना चांगला भाव मिळेल अशी शक्यता आहे.