अक्षय कुमारच्या भेटीने सद्गतीत रोहित कुमारची ‘पकड’ सुटली

प्रो कबड्डी लीग

rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र
arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या जन्मगावातील लोक म्हणतायत…

‘इंटरनॅशनल खिलाडी’ म्हणून बॉलिवूडमध्ये गेली अनेक वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या अक्षय कुमारचे चाहते सर्वत्र आहेत. त्याच्या दमदार प्रवेशाने आजतागायत अनेक जण घायाळ झाले आहेत. युवा-युवती त्याची एक झलक पाहण्यासाठी काहीही करायला तयार असतात. याची प्रचिती शनिवारी नवी दिल्लीच्या त्यागराज स्टेडियवरही आली. प्रो कबड्डी लीगची लढत पाहण्यासाठी अक्षय तिथे आला होता. पण यावेळी कुणी सामान्य माणूस नव्हे, तर बेंगळूरू बुल्सचा कर्णधार रोहित कुमारला त्याने मंत्रमुग्ध केले. अक्षयच्या भेटीने सद्गतीत रोहितची सामन्यावरील ‘पकड’ सुटली आणि भावनेच्या भरात बेंगळूरूने सामना गमावला. सामन्यानंतर रोहितने अक्षयकडे याची कबुली दिली, तेव्हा त्याने ‘तू खिलाडी है, खेल पे ध्यान दे’ असा सल्ला दिला.

नाटय़मय कलाटणीचे सत्र बंगाल वॉरियर्स आणि बेंगळूरू बुल्स यांच्यातील लढतीत पाहायला मिळाले. दुसऱ्या सत्रातील अखेरच्या नऊ मिनिटाला बंगालकडे १५-२५ अशी निर्विवाद आघाडी असताना सामन्यात रंगत निर्माण झाली. बेंगळुरूने प्रतिस्पर्धी संघाच्या चुकांचा फायदा उचलताना सामना २६-२८ असा अटीतटीचा बनवला. बंगालने नऊ मिनिटाला दिलेल्या लोणला बेंगळूरूने मध्यंतरानंतर अखेरच्या पाच मिनिटांत परफेड केली. सामना बेंगळूरूच्या बाजूने झुकणार असे वाटत असताना बंगालने संयमाने खेळ करत ३३-२९ असा विजय निश्चित केला. या पराभवाबाबत विचारले असता रोहित म्हणाला, ‘‘अक्षय कुमार आल्यामुळे मला खेळावर लक्षच देता आले नाही. मी इतका भावूक झालो होतो की, सामन्याप्रसंगी त्याच्याकडेच पाहात होतो. त्यामुळे काही चुकाही माझ्याकडून झाल्या!’’

रोहित हे सांगत असताना बॉलिवूडच्या ‘खिलाडी’मुळे कबड्डीतील खेळ हरवला असा सूर उमटत होता. आपली चूक मान्य करत रोहित म्हणाला की, ‘‘अखेरच्या दीड मिनिटांत चार गुणांनी पिछाडीवर होतो आणि आमच्या दोन चढाया शिल्लक होत्या. लक्ष देऊन खेळलो असतो, तर सामना जिंकलो असतो. माझ्याकडून चूक झाली. अशा चुरशीच्या क्षणी समोरच्याकडून गुण घ्यायचे असतात, पण मी इतका भावूक झालो की अपेक्षांची पूर्तता करू शकलो नाही.’’

या पराभवामुळे बेंगळूरूचे स्पर्धेतील आव्हान धोक्यात आले आहे. आता बाद फेरी गाठण्यासाठी त्यांना पुढील सहाही सामने जिंकावे लागणार आहेत. याबाबत रोहित म्हणाला, ‘‘ही लढत आमच्यासाठी महत्त्वाची होती. आज विजय मिळवला असता तर संघाचे मनोबलही उंचावले असते. बचावपटूंनी कामगिरी चोख बजावली, हरीश नाईक चढाईत उजवा ठरला. मी निराश केले.’’

दुसऱ्या सामन्यात पुणेरी पटलणने पहिल्या सत्रातील पिछाडी भरून काढताना यजमान दबंग दिल्लीवर ३४-२९ अशी मात केली. या पराभवामुळे दिल्लीच्या अडचणी वाढल्या आहेत.

आजचे सामने

*  बंगाल वॉरियर्स वि. तामिळ थलायव्हास.

* दबंग दिल्ली वि. हरयाणा स्टीलर्स.

*  सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.