काही खेळाडू आपल्यातील शारीरिक व्यंगावर किंवा आकस्मिकपणे आलेल्या आजारावर मात करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवतात. एखाद्या स्पर्धेपुरतेच ते हिरो ठरत नाहीत तर जनसामान्यांच्या मनात, हृदयात ते जागा मिळवतात. अनेक चाहत्यांसाठी ते युगपुरुष ठरतात. त्यांच्यापासून प्रेरणा घेत, त्यांना आदर्श मानून अनेक जण आपल्या कारकीर्दीला सुरुवात करतात. पण मैदानावरील अनुकरणीय किंवा आदर्श वाटणाऱ्या या खेळाडूंची दुसरी बाजू जगासमोर येते, त्यावेळी त्याच्या आधीच्या प्रतीमेला फार मोठा तडा गेलेला असतो.
लान्स आर्मस्ट्राँग आणि ऑस्कर पिस्टोरियस ही त्यापैकीच दोन उदाहरणे. शारीरिक तंदुरुस्तीची कसोटी पाहणाऱ्या टूर डी फ्रान्ससारख्या प्रतिष्ठेच्या सायकल शर्यतीचे जेतेपद पटकावणे म्हणजे अग्निदिव्यच. पण अमेरिकेच्या लान्स आर्मस्ट्राँगने एकदा-दोनदा नव्हे तर सलग सात वेळा हे अग्निदिव्य पार केले. विशेष म्हणजे कर्करोगासारख्या आजारावर मात करून आर्मस्ट्राँगने ही स्पर्धा जिंकल्यामुळे तो प्रेरणादायी आणि सर्वाच्या गळ्यातील ताईत बनला. आर्मस्ट्राँगच्या खडतर आयुष्यावर आधारित अनेक सिनेमेही निघाले. पण टूर डी फ्रान्स स्पर्धेतील अखेरचे जेतेपद २००५साली जिंकल्यावर तब्बल सात वर्षांनी गेल्या वर्षी आर्मस्ट्राँगच्या कृष्णकृत्यांची दुसरी बाजू अमेरिकेच्या उत्तेजक विरोधी संस्थेने सर्वासमोर आणली, त्यावेळी त्याच्या प्रत्येक चाहत्याला आश्चर्याचा धक्काच बसला. कोणत्याही चाचणीला सामोरे गेलो तरी आपण उत्तेजकांचे सेवन केले आहे, हे कुणालाही समजू शकणार नाही, अशी अद्ययावत उत्तेजके आर्मस्ट्राँगने घेतली. इतकेच नव्हे तर आपल्या सहकाऱ्यांनाही त्याने उत्तेजके घेण्यास भाग पाडले. ऑप्रा विन्फ्रेच्या मुलाखतीत खुद्द आर्मस्ट्राँगनेच आपल्या कृत्याची कबुली दिल्यानंतर चाहत्यांच्या देवघरात जागा मिळवलेला आर्मस्ट्राँग सर्वाच्याच नजरेतून उतरला.
लहान असताना ११व्या महिन्यातच गुडघ्याखालचे पाय निकामी झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा धावपटू ऑस्कर पिस्टोरियस आयुष्याची लढाई हरला नाही. १५व्या वर्षी आई गमावल्याचे दु:ख त्याने पचवले. ‘‘हरलेली किंवा पराभूत झालेली व्यक्ती कायम शेवटच्या क्रमांकावरच राहील, असे नाही तर त्याच्यातही अव्वल क्रमांक पटकावण्याची क्षमता असते,’’ हे आईच्या मृत्यूचा धक्का पचविल्यानंतरचे त्याचे उद्गार. मानसिकदृष्टय़ा कणखर असलेल्या पिस्टोरियसने आयुष्यातील अनेक आघातांवर लिलया मात केली. दोन्ही पायांनी सुदृढ असणाऱ्यांच्या ऑलिम्पिकमध्ये आपल्याला स्थान मिळवण्यासाठी त्याने न्यायालयीन लढा दिला. त्यात यश मिळाल्यानंतर २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये धावण्याची त्याची संधी हुकली. पण २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याला फायबरच्या ब्लेडसह धावताना पाहून स्टेडियममधील आणि जगभरातील तमाम चाहत्यांनी त्याला कुर्निसात केला. ‘ब्लेड रनर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिस्टोरियसने चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आपण शरीरानेच नव्हे तर मनाने आणि जिद्दीनेही सक्षम आहोत, हे दाखवून दिले. त्यानंतर झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत त्याने दोन सुवर्णपदकांची कमाईसुद्धा केली. पण जिद्द आणि चिकाटीबाबत ज्याच्याकडून प्रेरणा घ्यावी, त्या पिस्टोरियसवरच आपल्या प्रेयसीचा खून केल्याचा आरोप दक्षिण आफ्रिकेच्या न्यायालयाने लावला आहे. पिस्टोरियसने चोर समजून प्रेयसीलाच गोळ्या घातल्या, हे प्रथमदर्शनी समोर आले असले तरी पिस्टोरियसच्या भडक आणि वादग्रस्त जीवनशैलीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
वेगाने धावण्याबरोबरच बेधुंदपणे कार आणि बोट चालवणे याची ऑस्करला नशा. याचप्रमाणे सुंदर प्रेयसी आणि बंदूक यांचा सहवास तो जोपासायचा. पिस्टोरियसच्या आयुष्याची हीच दुसरी बाजू. वेगावर स्वार होतानाच अनेक अपघातांनाही त्याने जवळ केले. २००९मध्ये दक्षिण आफ्रिकेतील एका नदीत त्याची बोटीच्या अपघातात पिस्टोरियसच्या दोन बरगडय़ा आणि जबडय़ाला जबर मार बसला. पिस्टोरियसला पूर्ववत आणण्यासाठी त्याच्या शरीरावर १७२ टाके घालण्यात आले. अपघाताच्या वेळी त्याच्या कारमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या, पण त्याच्या शरीरात मद्याचा किती अंश आहे, याची चाचणी मात्र घेण्यात आली नव्हती. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अनेक धोके पत्करणारा पिस्टोरियस तितकाच घाबरटसुद्धा होता. जगातील सर्वात हिंसक देशांपैकी एक म्हणजे दक्षिण आफ्रिका. म्हणूनच दक्षिण आफ्रिकेतील १.५ दशलक्ष लोक आपल्याकडे बंदूक बाळगत असतात. ‘‘घरात कधीही घुसखोर शिरेल, या भीतीने आपण पिस्तूल, मशिनगन तसेच क्रिकेट आणि बेसबॉलची बॅट उशाशी घेऊन झोपतो,’’ असे पिस्टोरियने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. चार वर्षांपूर्वी एका पार्टीत १९ वर्षीय महिलेची छेड काढल्याप्रकरणी पिस्टोरियसला एक दिवस तुरुंगातही डांबण्यात आले होते. गेल्या वर्षी एका महिलेबरोबर झालेल्या भांडणानंतर त्याने एका व्यक्तीला पाय तोडण्याची धमकीही दिली होती.
अतिशय उन्मत स्वभावाच्या आणि कायम धोके पत्करणाऱ्या पिस्टोरियसची जीवनशैली हादरवून सोडणारी आहे. चोर समजून प्रेयसीचा खून केल्याची घटना घडल्यानंतर ज्या गोष्टी आता जगासमोर येत आहेत, त्या चक्रावणाऱ्या आहेत. प्रेयसीला त्याने चुकून की जाणूनबुजून ठार मारले, हे तपासाअंती समोर येईलच. पण आपल्या अद्भूत कौशल्याच्या आधारावर सर्वाच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारा नायक पिस्टोरियस या घटनेमुळे क्षणार्धातच खलनायक ठरला, हे मात्र नक्की!