सध्या भारताचा कसोटी संघ हा आपल्या सर्वोच्च शिखरावर आहे. मायदेशात न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांना पराभूत केल्यानंतर भारताने श्रीलंकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका २-० ने आपल्या खिशात घातली आहे. या मालिकेतही निर्भेळ यश संपादन करण्याचा भारतीय संघाचा विचार असणार आहे. सध्या भारतीय संघात विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा यासारख्या अनुभवी आणि नवोदीत खेळाडूंचा भरणा आहे. मात्र भारताच्या कसोटी संघाला एका खेळाडूने आपल्या खेळाने एकत्र बांधून ठेवलं आहे. अजिंक्य रहाणे भारताच्या कसोटी संघाला एकत्र जोडून ठेवणारा दुवा आहे असं म्हणलं तरीही वावगं ठरणार नाही.

अजिंक्य रहाणेचं भारताच्या कसोटी संघात असणं महत्वाचं का आहे, याची ५ प्रमुख कारणं आपण पाहणार आहोत.

१. अजिंक्य रहाणेमुळे कसोटी संघाला स्थैर्य –

भारताच्या कसोटी संघात शिखर धवन, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल यांच्यासारखे आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. यापैकी कोणत्याही फलंदाजांच्या गुणवत्तेविषयी कोणाच्याही मनात शंका असूच शकत नाही. मात्र काहीवेळा आक्रमक सुरुवात करुन देण्याच्या नादात हे आघाडीचे फलंदाज अनेक वेळा लवकर बाद होतात. अशावेळी अजिंक्य रहाणेसारखा शांत डोक्याने खेळणारा फलंदाज संघात हवा असतो.

भारताची वॉल म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड प्रमाणे अजिंक्य रहाणे मधल्या फळीत भारताची कमान सांभाळणारा महत्वाचा खेळाडू बनला आहे. पंचांनी दिलेल्या निर्णयावर DRS मागताना अनेक वेळा कर्णधार विराट कोहली गोलंदाजांच्या प्रभावाखाली येऊन तिसऱ्या पंचांकडे दाद मागतो. मात्र अजिंक्य रहाणे हा फलंदाजीप्रमाणे स्लिपमधला सर्वोत्तम क्षेत्ररक्षकही आहे. अशावेळी अजिंक्य रहाणेने डीआरएसबद्दल दिलेला सल्ला हा नेहमी फायदेशीर ठरताना दिसला आहे.

२. रहाणे भारताच्या मधल्या फळीतला महत्वाचा फलंदाज –

भारतीय संघात सलामीवीर म्हणून लोकेश राहुल, मुरली विजय किंवा शिखर धवन; तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांच्या जागा या नक्की झालेल्या आहेत. याचप्रमाणे रहाणे हा भारताच्या मधल्या फळीचा सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. कठीण प्रसंगात संयमाने फलंदाजी करत संघाचा डाव सावरण्याचं महत्वाचं काम रहाणे आपल्या फलंदाजीने आतापर्यंत करत आलेला आहे.

संघ अडचणीत सापडला असेल तर बचावात्मक खेळ करुन संघाला सावरणं, तसेच चांगली सुरुवात झालेली असल्यास आपल्या ठेवणीतले खास फटके खेळत संघाची धावसंख्या वाढवण्याचं काम अजिंक्य रहाणे आतापर्यंत करत आला आहे.

३. आघाडीची फळी कोसळल्यास डाव सावरण्याचं काम करणारा फलंदाज –

काही वर्षांपूर्वी व्ही.व्ही.एस.लक्ष्मण भारतीय संघात जी जबाबदारी पार पाडायचा, तीच जबाबदारी आज अजिंक्य रहाणे भारतासाठी पार पाडत आहे. सलामीची फळी माघारी परतल्यास तळातल्या फलंदाजांना घेऊन अजिंक्य भारताचा डाव सावरतो. तेवढी क्षमता अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीत आहे.

४. विराटच्या अनुपस्थितीत संघाची कमान अजिंक्यच्या हाती –

आपल्या संयमी खेळाच्या जोरावर अजिंक्य रहाणे भारतीय संघाचा उप-कर्णधार बनलेला आहे. याआधी झिम्बावै दौऱ्यात अजिंक्यने भारताचं कर्णधारपद भूषवलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धर्मशाळा कसोटीत विराट कोहली दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेला असताना रहाणेनेच भारताची कमान सांभाळत अखेरच्या कसोटीतही भारताला विजय मिळवून देत मालिका भारताच्या खिशात घातली होती.

याचसोबत विराट कोहलीच्या आक्रमक शैलीला मैदानात योग्य वेळी शांत करण्याचं कामही रहाणेने आतापर्यंत केलं आहे. कर्णधार विराट कोहलीनेही अनेक वेळा मुलाखतींमधून ही गोष्ट मान्य केली आहे. मध्यंतरी इंग्लंड दौऱ्यात रहाणे फॉर्मात नसताना, त्याला संघातून वगळण्याची मागणी केली होती. मात्र यावेळी विराट कोहलीने अजिंक्य रहाणे हा कसोटी संघाचा अविभाज्य भाग असल्याचं सांगत, त्याला आपला पाठींबा दर्शवला होता.

५. स्लिपमधला भारताचा सर्वोत्कृष्ट खेळाडू –

सध्याच्या घडीला अजिंक्य रहाणे हा भारताचा स्लिपमधला सर्वोत्तम खेळाडू आहे. स्लिमध्ये क्षेत्ररक्षणासाठी लागणारे सर्व गुण हे अजिंक्य रहाणेच्या अंगात आहे. याचमुळे राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर रहाणे स्लिपमधली जागा सांभाळतो आहे.

आतापर्यंत भारताने स्लिपमध्ये मुरली विजय, शिखर धवन किंवा कर्णधार विराट कोहली यांनाही स्लिपमध्ये क्षेत्ररक्षणासाठी उभं केलं आहे. मात्र यापैकी कोणलाही ही जागा निट चालवता आली नाही. मात्र अजिंक्य रहाणेने स्लिपमध्येही क्षेत्ररक्षक म्हणून आपली जबाबदारी पुरेपूर निभावली आहे. नुकत्याच अजिंक्य रहाणेने ३९ कसोटींमध्ये स्लिपमध्ये ५० झेल घेण्याचा विक्रम केला आहे.