पेसचा निर्धार

रोहन अत्यंत मेहनती खेळाडू आहे. सातत्याने ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या अंतिम चारमध्ये तो वाटचाल करतो आहे. माणूस आणि खेळाडू म्हणून माझा त्याच्यावर विश्वास आहे. म्हणूनच रोहनच्या साथीने ऑलिम्पिक पदक पटकावू शकतो, असे उद्गार लिएण्डर पेसने काढले. २०१२ लंडन ऑलिम्पिकवेळी महेश भूपती, रोहन बोपण्णा आणि लिएण्डर यांच्या निवडीवरून झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे भारतीय टेनिसची नाचक्की झाली होती. भूपतीसह खेळत असल्याने त्या वेळी बोपण्णाने पेससह खेळण्यास नकार दिला होता. मात्र आता हे दोघे एकत्र खेळण्यास राजी असल्याचे पेसच्या उद्गारांवरून स्पष्ट होते आहे.
‘‘महेश आणि माझ्या जोडीने आश्चर्यकारक प्रदर्शन केले. सलग २४ लढतींत विजय असो किंवा डेव्हिस चषकातले प्रदर्शन किंवा ग्रँड स्लॅम जेतेपदे- जोडीचे समीकरण कमाल होते. सलग आठ वर्षे आम्ही एकत्र खेळत होतो, जिंकत होतो. दोघांच्याही अथक परिश्रमामुळेच हे यश मिळू शकले. भारतीय टेनिस इतिहासातले ते गौरवशाली पर्व होते. आमची जोडी विभक्त होण्याबाबत पुरेशी चर्चा झाली आहे. आमच्या जोडीने केलेली कामगिरी अभिमानास्पद इतिहास आहे, पण तो आता बाजूला ठेवायला हवा,’’ असे पेसने सांगितले.
पेस पुढे म्हणाला, ‘‘ऑलिम्पिक पदक आयुष्यभराच्या मेहनतीचे संचित असते. एखादा फटका तुमचे पदक हिरावू शकतो. प्रचंड सराव, प्रतिस्पध्र्याचा अभ्यास, तंदुरुस्ती आणि नशीब हे सगळे घटक जुळून आले तरच ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारू शकते. हे पदक पटकावण्यासाठी सगळे कौशल्य पणाला लागते. या पदकासाठी एकमेकांवरचा विश्वास महत्त्वाचा आहे. आमच्याबाबतीत तो आहे.’