भारत आणि ऑस्ट्रेलियात सध्या सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने २-० अशी आघाडी मिळवली आहे. चेन्नईतील पहिला सामना २६, तर कोलकात्यामधील दुसरा सामना ५० धावांनी जिंकत भारताने मालिका विजयाकडे दमदार वाटचाल केली आहे. आज इंदूरमधील होळकर स्टेडियमवर होणारा सामना जिंकल्यास भारत मालिकादेखील खिशात घालेल. मात्र या मालिकेत माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि कपिल देव यांना न जमलेली कामगिरी कर्णधार विराट कोहलीला करता येणार का, याबद्दल उत्सुकता आहे.

आजचा सामना भारताने जिंकल्यास कोहलीच्या नेतृत्त्वाखालील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा पहिलावहिला मालिका विजय असेल.   ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांमध्ये भारताची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत झालेल्या आठ मालिकांपैकी तीनच मालिका भारताला जिंकता आल्या आहेत. कपिल देव, महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका विजय मिळवला असला, तरीही प्रतिस्पर्ध्यांना ‘व्हाईटवॉश’ देण्याची कामगिरी या दोन्ही कर्णधारांना करता आलेली नाही. त्यामुळे कोहलीने ही कामगिरी केल्यास त्याच्या नावावर अनोखा विक्रम जमा होईल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले आहेत. दोन्ही देशांमधील मालिकांचा इतिहास लक्षात घेतल्यास अद्यापपर्यंत अशी कामगिरी भारताना एकदाही करता आलेली नाही. मात्र विराट कोहलीने ही कामगिरी करुन दाखवली आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला ‘व्हाईटवॉश’ देण्याची संधी विराटकडे आहे. या मालिकेतील एखादा सामना भारताने गमावला तरीही एका मालिकेतील ४ सामने जिंकण्याचा पराक्रम विराटच्या नावावर होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताने आतापर्यंत एकदाही ४ विजय मिळवलेले नाहीत. कपिल देव, महेंद्रसिंग धोनी या दिग्गज कर्णधारांनाही ही कामगिरी जमलेली नाही.

आतापर्यंत फक्त कपिल देव यांनाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाचे नेतृत्त्व करत असताना पहिल्याच मालिकेत विजय मिळवता आला आहे. १९८६ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर असताना ६ सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगली होती. या मालिकेत भारताने ३-२ असा विजय मिळवला होता. यानंतर २०१० साली म्हणजेच तब्बल २४ वर्षांनी भारताने ऑस्ट्रेलियावर मालिका विजय साजरा केला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारताने १-० असा विजय मिळवला. मात्र याआधीच्या दोन मालिकांमध्ये धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाला ४-२ असा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे कपिल देव यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच मालिकेत नेतृत्त्व करताना संघाला विजय मिळवून देण्याची संधी विराटसमोर आहे.