आशियाई क्रीडा स्पर्धेतील उपांत्य लढतीत पक्षपाती निर्णयामुळे मी दक्षिण कोरियाच्या जिना पार्कविरुद्ध पराभूत झाले. हा पराभव विसरण्याचा मी प्रयत्न केला मात्र त्या पराभवाचे सल मला अजूनही वाटत आहे, असे आशियाई कांस्यपदक विजेती बॉक्सर लैश्राम सरितादेवी हिने सांगितले.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे सरिता हिच्याबरोबर वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ती म्हणाली, केवळ पक्षपाती निर्णयामुळे माझी अंतिम फेरीची संधी हुकली. त्यानंतर झालेल्या घटना विसरण्याचा प्रयत्न मी केला. मात्र पार्कचा चेहरा अजूनही माझ्यासमोर येतो. जर पुन्हा मला तिच्याशी लढत देण्याची संधी मिळाली, तर मी तिला ‘नॉकआउट’ पंच मारूनच पराभूत करीन. अर्थात भूतकाळ विसरीत मी आगामी रिओ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले आहे.
रिओ ऑलिम्पिकच्या तयारीविषयी ती म्हणाली, या स्पर्धेत मी ६० किलो गटात भाग घेणार आहे. आतापर्यंत मी ५४ किलोपासून विविध वजनी गटात भाग घेत अनेक आंतरराष्ट्रीय पदके मिळविली आहेत. ऑलिम्पिक स्पर्धाचे पदक मला खुणावत आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी मी कठोर मेहनत घेत आहे. हे पदक मिळविणे सोपे नसले, तरीही मी माझ्यासाठी आदर्श असलेल्या मेरी कोमच्या यशाची पुनरावृत्ती करणार आहे.