भारतीय पुरुष हॉकी संघाचे नवनिर्वाचीत प्रशिक्षक जोर्द मरीन यांनी आपल्या टीकाकारांना कोणतही प्रत्युत्तर न देण्याचं ठरवलं आहे. टीका करणाऱ्यांचा मी जराही विचार करत नाही. भारतीय संघाला आंतराष्ट्रीय पातळीवर चांगले निकाल मिळवून देणं हे माझं काम आहे, आणि मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मरीन यांनी आपली बाजू मांडली.

जोर्द मरीन हे भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते. मात्र रोलंट ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीनंतर भारतीय संघाची जबाबदारी मरीन यांच्याकडे सोपवण्यात आली होती. ऑलिम्पिक, आशियाई, राष्ट्रकुल सारख्या महत्वाच्या स्पर्धेआधी करण्यात आलेल्या या बदलामुळे अनेक माजी खेळाडूंनी या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र आपल्या ध्येयावरुन लक्ष हटेल अशा कोणत्याही गोष्टीचा आपण विचार करणार नसल्याचं, मरीन यांनी म्हणलंय.

मरीन यांच्याकडे पुरुष संघाला प्रशिक्षण देण्याचा अनुभव नसल्याचं सांगत अनेकांनी हॉकी इंडियाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. मात्र या आरोपाला उत्तर देताना, “गेल्या ८ वर्षांमध्ये मी महिला संघापेक्षा पुरुष संघासोबत जास्त काळ काम केलं आहे. त्यामुळे माझ्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी मी उत्तम पद्धतीने पार पाडू शकतो”, असं मरीन म्हणाले.

अवश्य वाचा – आशिया चषकासाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा, सिनीअर खेळाडूंचं पुनरागमन

सध्याच्या घडीला भारतीय संघाची ओळख करुन घेणं हे माझ्यासमोरचं सर्वात मोठं काम आहे. दबावाखाली भारतीय संघ कसा खेळतो? एखाद्या स्पर्धेकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन कसा आहे? हे मला जाणून घ्यायचं आहे. संघाच्या कामगिरीवर प्रतिक्रीया देणं मरीन यांनी जाणीवपूर्वक टाळलं. आशिया करंडकात भारतीय संघ कसा खेळतो याचा अभ्यास करुन मी पुढची रुपरेषा आखेन असं मरीन यांनी म्हणलंय. त्यामुळे आगामी काळात मरीन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पहावं लागणार आहे.