आगामी आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर भारताचा कर्णधार श्रीजेशची भावना

देशाच्या सीमेवर रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यासाठी आम्ही आगामी आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर मात करू, असा आत्मविश्वास भारतीय वरिष्ठ हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेशने येथे व्यक्त केला. ही स्पर्धा २० ते ३० ऑक्टोबर या कालावधीत मलेशियात आयोजित होणार आहे.

उरी येथे नुकत्याच झालेल्या अतिरेकी हल्ल्यात भारताचे १८ जवान ठार झाले होते. त्याचा थेट उल्लेख न करता श्रीजेश म्हणाला, ‘‘चॅम्पियन्स स्पर्धेत पाकिस्तानकडून पराभवाची नामुश्की ओढवत आपल्या जवानांना निराश करण्याची आमची इच्छा नाही. त्यामुळेच पाकिस्तानला पराभूत करण्याचा आम्ही दृढनिश्चय केला आहे. उभय देशांमधील सामन्यांबाबत चाहत्यांमध्ये कायमच खूप उत्सुकता असते. या सामन्यात आम्ही आमच्या क्षमतेइतकी शंभर टक्के कामगिरी करून दाखवू.’’

भारत व पाकिस्तान यांच्यात २३ ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. सहा देशांमध्ये खेळविली जाणारी ही स्पर्धा अव्वल साखळी पद्धतीने होईल. याबाबत श्रीजेश म्हणाला, ‘‘पाकिस्तानचा संघ अपेक्षेइतका अव्वल दर्जाचा खेळ सध्या खेळत नाही. मात्र अनेक वेळा अनपेक्षित कामगिरी करीत प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना धक्का देण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. त्यामुळे आम्हाला काळजीपूर्वक खेळ करावा लागणार आहे.’’

भारतीय संघ सध्या येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात सराव करीत आहे. रिओ येथे नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतास आठवे स्थान मिळाले होते. भारतीय संघाच्या सराव शिबिराला १८ सप्टेंबर रोजी प्रारंभ झाला असून हे शिबीर चार आठवडय़ांचे आहे.