भारतीय महिला हॉकी संघाने ३६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ऑलिम्पिकमध्ये प्रवेश निश्चित केला. या संधीचे सोने करण्याचा निर्धार महिला हॉकी संघाने व्यक्त केला आहे. १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघ अखेरचा खेळला होता आणि त्यावेळी त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

‘‘स्वप्न सत्यात उतरले. आम्ही ऑलिम्पिकमध्ये प्रवेश केला आहे, यावर अजूनही विश्वास बसत नाही. ही बातमी कळताच आम्हाला अत्यानंद झाला. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण आहे आणि हा क्षण अधिक संस्मरणीय करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत,’’ असे मत भारतीय संघाची कर्णधार रितू राणीने व्यक्त केले.
आक्रमणपटू राणी रामपालने जपानविरुद्ध महत्त्वाचा गोल करून भारताच्या ऑलिम्पिकमधील आशा कायम राखल्या होत्या. रामपाल म्हणाली, ‘‘हा क्षण अविश्वसनीय आहे. ऑलिम्पिकमध्ये प्रवेश निश्चित झाल्याच्या वृत्तावर अजूनही विश्वास बसत नाही. गेली अनेक वर्षे या क्षणासाठी आम्ही खेळत आहोत आणि कसून सराव करत आहोत. स्वप्न सत्यात उतरवण्याची ही अखेरची संधी असल्याची कल्पना संघातील अनेकींना आहे आणि यावेळी बाजी मारायची.’’
भारताची गोलरक्षक सविता, उपकर्णधार दीपिका यांनीही या स्पध्रेत पराक्रम दाखवण्याचा निर्धार व्यक्त केला. संघाचे प्रशिक्षक मथायस अहरेन्स म्हणाले की, ‘‘अँटवर्प येथील प्रत्येक सामन्यात मी खेळाडूंना याचीच आठवण करून देत होतो की, रिओ ऑलिम्पिकसाठीची हीच संधी आहे. हे स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. या पात्रतेमुळे माझ्यावरील जबाबदारी आणखी वाढली आहे.’’