आंतरशालेय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धाचा वैयक्तिक स्वार्थासाठी व आर्थिक उत्पन्नासाठी उपयोग होत असल्याचे लक्षात आल्यामुळे त्याचा फेरआढावा घेतला जाणार आहे, असे भारतीय शालेय क्रीडा महासंघाचे अध्यक्ष सतपाल यांनी येथे सांगितले.

‘‘शालेय स्तरावर चाळीसहून अधिक क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जात असते. मात्र अनेक वेळा केवळ गुण मिळविण्यासाठीच त्याचा उपयोग केला जात असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत, त्याचा आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत. लहान मुलामुलींनी सायंकाळी मैदानावर दोन-तीन तास खेळावे या उद्देशाने आम्ही अनेक नवीन क्रीडा प्रकारांचा समावेश केला होता, मात्र त्याचा अनेक ठिकाणी दुरुपयोग केला जात आहे, असे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही या क्रीडा प्रकारांच्या दर्जाबाबत अवलोकन करीत आहोत. तसेच ऑलिम्पिक क्रीडा प्रकार व देशी खेळांना अधिक प्राधान्य देणार आहोत,’’ असे सतपाल यांनी सांगितले.
बुद्धिबळात प्राथमिक शाळेतील खेळाडूंना भाग घेण्यापासून वंचित केले जात आहे. त्यावर काय उपाययोजना केली जाणार आहे असे विचारले असता सतपाल म्हणाले, ‘‘आम्ही नुकतीच महासंघाच्या तांत्रिक समितीची बैठक घेतली होती व आता शालेय क्रीडा स्पर्धाबाबत किमान वयाची अट राहणार नाही अशी सूचना सर्व राज्यांना कळवली आहे.’’
‘‘शालेय क्रीडा स्पर्धामधील नैपुण्य शोध घेण्यासाठी आम्ही राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धामधील खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेणार आहोत. त्याआधारे देशात चार विभागीय स्तरावर २० ते ३० नैपुण्यवान खेळाडूंची निवड करणार आहोत. या खेळाडूंचे शिबीर आयोजित केले जाणार असून त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार आहे,’’ असेही सतपाल यांनी सांगितले.