न्यूझीलंडचा ऑफ-स्पिनर केन विल्यम्सनच्या गोलंदाजीची शैली अयोग्य असल्याचा निर्वाळा देत त्याच्या गोलंदाजीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बंदी घालण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असेही आयसीसीने पुढे म्हटले आहे.
कार्डिफ महानगर विद्यापीठाच्या कार्डिफ स्कूल ऑफ स्पोर्ट्समध्ये ९ जुलैला विल्यम्सनच्या गोलंदाजीची शास्त्रशुद्ध चाचणी घेण्यात आली. नियमानुसार गोलंदाजी करताना हात १५ अंशांच्या कोनापर्यंत वळवण्यास परवानगी आहे; परंतु विल्यम्सन गोलंदाजी करताना ही मर्यादा ओलांडत असल्याचे सिद्ध झाले.
गेल्या महिन्यात त्रिनिदाद येथे झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात विल्यम्सनच्या गोलंदाजीच्या शैलीबाबत ठपका ठेवण्यात आला. संशयास्पद गोलंदाजीच्या शैलीबाबत आयसीसीच्या कलम २.४मध्ये नमूद केल्यानुसार, स्वत:च्या गोलंदाजीत सुधारणा करून विल्यम्सनची पुन्हा चाचणी होईल. त्यात तो उत्तीर्ण झाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला पुन्हा गोलंदाजी करता येईल.
वादग्रस्त गोलंदाजीच्या शैलीप्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजीसाठी बंदी घालण्यात आलेला विल्यम्सन हा न्यूझीलंडचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
वादग्रस्त गोलंदाजीच्या शैलीप्रकरणी आयसीसीने भारताचा ऑफस्पिनर हरभजन सिंग, इंग्लंडचा जेम्स किर्टले, वेस्ट इंडिजचे जेर्मेनी लॉसन व शेन शिलिंगफोर्ड, पाकिस्तानचे शोएब मलिक व शब्बीर अहमद तसेच श्रीलंकेचा ऑफ-स्पिनर सचित्र सेनानायके आदी अनेक गोलंदाजांवर निलंबनाची कारवाई केली होती.