सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांना २९ जूनपासून सुरू होणाऱ्या विम्बल्डन टेनिस स्पध्रेत अनुक्रमे पुरुष व महिला गटात अव्वल मानांकन देण्यात आले आहे. कामगिरीत सातत्याचा अभाव असल्यामुळे या स्पध्रेचे दोन वेळा जेतेपद पटकावणाऱ्या राफेल नदालला दहाव्या मानांकनावर समाधान मानावे लागले आहे.
गतविजेता जोकोव्हिच आणि पाच वेळा स्पध्रेत बाजी मारणारी सेरेना या जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या खेळाडूंची कामगिरी सध्या चांगलीच बहरलेली आहे. त्यामुळेच त्यांना अव्वल मानांकन मिळाले. दुसरीकडे २००८ आणि २०१०मध्ये विम्बल्डनचा ताज पटकावणाऱ्या नदालला गेल्या तीन स्पर्धामध्ये अनुक्रमे दुसऱ्या, पहिल्या आणि चौथ्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. त्याचाच परिणाम म्हणून त्याला १०वे मानांकन मिळाले आहे. ‘लाल मातीचा बादशाह’ हा मान पटकावणाऱ्या नदालला यंदा फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेतही अपयश आले. विम्बल्डनमध्येही त्याच्यासमोर खडतर आव्हान असणार आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या या स्पध्रेच्या चौथ्या फेरीत त्याचा सामना जोकोव्हिच, रॉजर फेडरर किंवा अँडी मरे या मातब्बर खेळाडूंशी होण्याची शक्यता आहे. आठव्या विम्बल्डन जेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या फेडररला दुसरे, तर मरेला तिसरे मानांकन देण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलिया आणि फ्रेंच खुल्या स्पध्रेच्या जेतेपदानंतर विम्बल्डनमध्ये बाजी मारण्यासाठी सज्ज झालेल्या सेरेनापाठोपाठ गतविजेत्या पेट्रा क्विटोव्हाला दुसरे मानांकन देण्यात आले आहे. सिमोना हॅलेप आणि मारिया शारापोव्हा यांना अनुक्रमे तिसरे व चौथे मानांकन मिळाले आहे.
अव्वल दहा मानांकने
पुरुष : १. नोवाक जोकोव्हिच (सर्बिया), २. रॉजर फेडरर (स्वित्र्झलड), ३. अँडी मरे (ब्रिटन), ४. स्टान वॉवरिंका (स्वित्र्झलड), ५. केई निशिकोरी (जपान), ६. थॉमस बर्डिच (झेक प्रजासत्ताक), ७. मिलॉस राओनिक (कॅनडा), ८. डेव्हिड फेरर (स्पेन), ९. मॅरिन सिलिक (क्रोएशिया), १०. राफेल नदाल (स्पेन)
महिला : १. सेरेना विल्यम्स (अमेरिका), २. पेट्रा क्वितोवा (झेक प्रजासत्ताक), ३. सिमोना हॅलेप (रोमानिया), ४. मारिया शारापोव्हा (रशिया), ५. कॅरोलिन वोझनिआकी (डेन्मार्क), ६. ल्युसी साफारोव्हा (झेक प्रजासत्ताक), ७. अ‍ॅना इव्हानोविक (सर्बिया), ८. एकाटेरिना माकारोव्हा (रशिया), ९. कार्ला सुआरेज नावारो (स्पेन), १०. अ‍ॅगेंलिक केर्बर (जर्मनी).