हारजीतपेक्षाही अत्युच्य दर्जाच्या टेनिसची मैफल गाजवणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम मुकाबल्यात नोव्हाक जोकोव्हिचने आपली मोहर उमटवली. कलात्मक शैलीपेक्षा घोटीव सातत्याच्या बळावर जोकोव्हिचने रॉजर फेडररवर ७-६, ६-७, ६-४, ६-३ असा विजय मिळवत विम्बल्डनच्या तिसऱ्या तर कारकीर्दीतील नवव्या ग्रँड स्लॅम जेतेपदावर कब्जा केला. काही दिवसांपूर्वीच फ्रेंच खुल्या स्पर्धेत जोकोव्हिचचा विजयवारू उपांत्य फेरीतच थांबला होता. मातीवरून गवतावरच्या परिवर्तनात जोकोव्हिचने एक पाऊल पुढे टाकत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दुसरीकडे जेतेपदापेक्षा संन्यस्त अशा दर्जेदार खेळण्यावर भर देणाऱ्या फेडररचा ग्रँड स्लॅम जेतेपदांचा दुष्काळ तिसऱ्या वर्षीही कायम राहिला.
पहिल्या सेटमध्ये फेडररने ४-२ अशी आघाडी घेतली. मात्र चिवटपणासाठी प्रसिद्ध जोकोव्हिचने हळूहळू आगेकूच करत मुकाबला टायब्रेकरमध्ये नेला. सव्‍‌र्हिसमधली हरपलेली लय आणि निर्णायक क्षणी झालेल्या दुहेरी चुका याचा फायदा उठवत जोकोव्हिचने पहिला सेट जिंकला. दुसरा सेटमध्ये रंगलेल्या अटीतटीच्या मुकाबल्यात फेडररने आपल्या गतवैभवाची झलक पेश केली. ५-५, ६-६ अशी बरोबरीत पुढे जाणाऱ्या आणि टायब्रेकरमध्ये गेलेल्या मुकाबल्यात फेडररने बाजी मारली. अगदी समीप येऊनही क्षणिक चुकांमुळे सेट गमवावा लागल्यामुळे जोकोव्हिच निराश झाला. दुसऱ्या सेटनंतर पावसाचे आगमन झाले. सक्तीच्या विश्रांतीचा पुरेपूर फायदा उठवत नव्या ऊर्जेसह जोकोव्हिच परतला. मरेविरुद्धच्या लढतीत भेदक सव्‍‌र्हिस हे फेडररचे मुख्य अस्त्र होते. मात्र अंतिम लढतीत फेडररचे हे शस्त्र म्यान झाले. झटपट गुण मिळवत जोकोव्हिचने तिसरा सेट नावावर केला. चौथ्या सेटमध्ये जोकोव्हिचने सर्वागीण खेळ आणि अचूकतेचा दर्जा उंचावत फेडररला निष्प्रभ केले. दुसऱ्या सेटमध्ये जीवाचं रान करत खेळणाऱ्या फेडररचा खेळ तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये घसरत गेला. चौथ्या सेटमध्ये तडाखेबंद स्मॅशच्या फटक्यासह जोकोव्हिचने विजयी आरोळी ठोकली व हाऊसफुल्ल मैदानातील प्रत्येकाने जोकोव्हिचला मानवंदना दिली.

फेडररविरुद्ध खेळताना कौशल्य पणाला लागते, एकेक गुण मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. फेडररविरुद्ध खेळणे हे मोठे आव्हान आहे. माझ्या पिढीतील बहुतांशी खेळाडूंनी फेडररला पाहातच टेनिसची धुळाक्षरे गिरवली आहेत. विम्बल्डनसारख्या ऐतिहासिक स्पर्धेत फेडररविरुद्ध अंतिम सामना खेळायला मिळणे हा माझा सन्मान आहे. अशा लढतींसाठी आयुष्यभर तयारी करावी लागते. जेतेपदाचा झळाळता चषक उंचावू असं मनात अनेकदा योजलेले असते. आज तो क्षण पुन्हा अनुभवता येणार आहे. अंधश्रद्धा म्हणून नाही, पण विम्बल्डन कोर्टवरील गवत अतिशय गोड लागते. या गवतानेच इतिहास घडवण्याची संधी दिली आहे, म्हणूनच मी गवत खातो.
-नोव्हाक जोकोव्हिच

फेडररचा अपेक्षाभंग
कारकीर्दीच्या सायंकाळी आणि ३३व्या वर्षी फेडररचे विक्रमी १८वे ग्रँड स्लॅम जेतेपदाचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी जगभरातल्या ‘फेडररचाहत्यांनी’ प्रार्थना केली होती. मात्र ओथंबलेल्या भावनांपेक्षा कठोर व्यावसायिकता कामी येते, याचा प्रत्यय देत जोकोव्हिचने ऐतिहासिक जेतेपदाला गवसणी घातली. ‘फेडरर म्हणजे जेतेपद’ असे समीकरण चाहत्यांच्या मनात पक्के असते. मात्र वाढते वय आणि दुखापती यामुळे फेडररचा सूर हरपतच गेला. प्रत्येक स्पर्धेत जेतेपदासाठी प्रयत्न करणार, असे फेडरर म्हणतो. उपांत्य-अंतिम फेरीपर्यंत तो मजलही मारतो. मात्र त्याचे ग्रँड स्लॅम जेतेपदाचे स्वप्न अधुरेच राहते. २०१२मध्ये विम्बल्डनच्याच ग्रास कोर्टवर त्याने शेवटचा जेतेपदाचा चषक उंचावला होता. तिशी ओलांडल्यानंतरही त्याच्या खेळातले सातत्य प्रशंसनीय आहे, मात्र जेतेपद न मिळवता येण्याचा सल दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. शरीराच्या आणि खेळाच्या बदलत्या समीकरणांची नोंद घेत फेडररने सन्मानाने निवृत्त व्हावे अशी भावना त्याच्या बहुतांशी चाहत्यांच्या मनात आहे. कारण कधी थांबायचे, या निर्णयाने महानता सिद्ध होते.