विम्बल्डन जेतेपदाचा विक्रम करेन, असे स्वप्नातही वाटले नव्हते – फेडरर

विम्बल्डनसारख्या प्रतिष्ठेच्या टेनिस स्पर्धेत मी विक्रम प्रस्थापित करून शकतो, हे मी स्वप्नातही पाहिले नव्हते, अशी प्रांजळ कबुली यंदा आठव्यांदा जेतेपदाला गवसणी घालणाऱ्या रॉजर फेडररने दिली.

फेडररने १६ वर्षांपूर्वी महान टेनिसपटू पीट सॅम्प्रसला पराभूत केले होते. त्या वेळी टेनिस विश्वाला एक दर्जेदार खेळाडू मिळाल्याची भावना व्यक्त केली जात होती. त्यापूर्वी फेडरर सॅम्प्रससारख्या दिग्गज टेनिसपटूला धक्का देईल, असे कोणाला वाटलेही नव्हते.

‘सॅम्प्रसवर विजय मिळवल्यावर मी टेनिसमध्ये एवढे मोठे यश मिळवू शकतो, याचा कधी विचारही केला नव्हता. पण मला आशा होती की, मी यानंतर एकदा तरी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचू शकेन, पण या स्पर्धेत एवढी जेतेपद माझ्या नावावर होतील, असे मला कधीही वाटले नव्हते. कारण एवढय़ा मोठय़ा स्पर्धेची आठ जेतेपदे पटकावण्याचा विचारही कुणी केला नसेल. एवढे मोठे यश मिळवण्यासाठी गुणवत्ता तर हवीच, पण त्याचबरोबर तुम्हाला काही लोकांचा पाठिंबा लागतो. माझ्या प्रशिक्षकांनी, कुटुंबीयांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आणि त्यामुळेच मी इथपर्यंत  पोहोचू शकलो,’ असे फेडरर म्हणाला.

विम्बल्डनचे जेतेपद पटकावणारा फेडरर हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. याबाबत फेडरर म्हणाला, ‘माझ्यासाठी हे वर्ष अद्भुत असेच आहे. कारण या वर्षांत माझ्याकडून स्वप्नवत कामगिरी झाली आहे. या वर्षांमध्ये मी कठीण परिस्थितीवर मात केली आहे. प्रत्येक दिवसागणिक माझ्या खेळात बदल होत गेले. वयानुरूप काही बदल मलाही स्वीकारावे लागले. या मोसमापूर्वी मी दोन जेतेपद पटकावणार, असे सांगितले असते तर माझ्यावर बरेच लोक हसले असते. त्यांना मला काहीही दाखवून द्यायचे नव्हते. पण स्वत:च्या खेळावर भर दिला आणि मी  जिंकू शकलो. हा माझा अखेरचा सामना नक्कीच नाही.’