आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा म्हणजे चीनची मक्तेदारी असे मानले जाते. मात्र त्यांच्या साम्राज्याला सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आखाती देशांमधील खेळाडूंद्वारेच त्यांच्या वर्चस्वाला आव्हान मिळण्याची शक्यता आहे.
‘पदक जिंका आणि नागरिकत्व मिळवा’ असा कानमंत्र देत आखाती देशांनी आफ्रिका खंडातील खेळाडूंना आयात करण्याचा मार्ग पत्करला आहे. दक्षिण आफ्रिका, केनिया, युगांडा आदी अनेक देशांमधील खेळाडूंना आपल्या देशात व्यावसायिक अ‍ॅथलिट्स म्हणून पाचारण करण्यात येत आहे. केवळ खेळाडूच नव्हे तर अनेक परदेशी प्रशिक्षकांनाही दीर्घकालावधीसाठी संधी दिली जात आहे. बहारिन, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार आदी देशांमधून अनेक आफ्रिकन खेळाडू आशियाई व अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होऊ लागले आहेत.
सौदी अरेबियाच्या पथकातील तांत्रिक अधिकारी डॉ. महजोब सईद यांनी सांगितले, ‘‘आम्ही अनेक आफ्रिकन खेळाडूंना संधी द्यायला सुरुवात केली आहे. आफ्रिकेतील अनेक नैपुण्यवान खेळाडूंना आर्थिक समस्या जाणवत असते. अशा खेळाडूंना आमच्याकडे प्रायोजकत्व मिळविण्यात फारशी अडचण येत नाही. आशियाई व ऑलिम्पिक स्पर्धामध्ये पदक मिळविणे, हेच त्यांच्यापुढे मुख्य ध्येय ठेवले जाते. त्यादृष्टीने त्यांच्याकरिता नियोजनबद्ध प्रशिक्षणाचा कार्यक्रमही ठेवण्यात येतो. परदेशी प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते तसेच अनेक युरोपियन स्पर्धामध्येही त्यांना सहभागाची संधी दिली जाते. अरेबिक ऑलिम्पिक महासंघातर्फेही आखाती देशांमध्ये सातत्याने स्पर्धाचे आयोजन केले जाते. त्याचा फायदा त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी होत आहे.’’
सौदी अरेबियाच्या खेळाडूंकरिता द्वायने मिलर (अमेरिका) व आंद्रे गुस्तोव्ह (युक्रेन) या परदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिलर यांच्याकडे कमी अंतराच्या शर्यतींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आंद्रे यांच्याकडे विविध फेकीचे प्रकार व उड्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी आहे.
‘‘रिओ येथे २०१६मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत किमान १५ सुवर्णपदकांसह ४० पदकांचे ध्येय आमच्या खेळाडूंसमोर ठेवण्यात आले आहे,’’ असे मिलर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘ऑलिम्पिकपूर्वी या खेळाडूंना दोन-तीन महिने अमेरिकेत प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल. तसेच त्यांना युरोपातीलकाही स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. या खेळाडूंना बूट, ट्रॅकसूट, टी शर्ट्स, फिजिओ, परदेशी दौरे आदी सर्व प्रकारच्या सुविधांकरिता पुरस्कर्ते मिळविण्यात अडचण येत नाही.’’
संयुक्त अरब अमिराती संघाकरिता बल्गेरियाचे ज्येष्ठ ऑलिम्पिकपटू इलियाज पिश्तोकोव्ह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेले एक वर्ष ते या खेळाडूंबरोबर आहेत. धावणे, अडथळा शर्यत तसेच लांब उडी या क्रीडाप्रकारांचे मार्गदर्शनाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. २०१६ च्या ऑलिम्पिक स्पर्धापर्यंत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते म्हणाले, ‘‘आशियाई क्रीडा स्पर्धा व ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा या स्पर्धामध्ये आमच्या खेळाडूंना चांगले यश मिळविता यावे यासाठी कालबद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामध्ये परदेशातील स्पर्धामधील सहभाग राहणार आहे.’’
डायमंड लीग स्पर्धेत तुमचे खेळाडू सहभागी होणार आहेत काय, असे विचारले असता पिश्तोकोव्ह म्हणाले, ‘‘आमच्या संघात बऱ्याचशा उदयोन्मुख खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळेच यंदा त्यांना या स्पर्धेत न उतरविता पुढील वर्षी त्यांना या स्पर्धेत उतरविले जाणार आहे. तोपर्यंत त्यांना विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धाचाही अनुभव मिळू शकेल व त्यांच्या कामगिरीत परपक्वता येईल.’’
कतारने कमी अंतराच्या शर्यतींकरिता अमेरिकन प्रशिक्षक जेन्सी ब्रॅडली यांची नियुक्ती केली आहे. गेली एक वर्ष ते या खेळाडूंसमवेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारा सॅम्युअल फ्रान्सिस याने आशियाई स्तरावर आतापर्यंत चांगले यश मिळविले आहे.