गोलंदाजी आणि फलंदाजीचा अप्रतिम नजराणा पेश करत वेस्ट इंडिजने  तिसऱ्या कसोटीत इंग्लंडवर ५ विकेट्स राखून विजय मिळवला आणि तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधण्यात यश मिळवले. इंग्लंडचा दुसरा डाव १२३ धावांत गुंडाळून वेस्ट इंडिजने १९२ धावांचे आव्हान स्वीकारले. या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमानांची पळता भुई झाली, परंतु डॅरेन ब्राव्हो आणि जरमाइन ब्लॅकवूड यांनी पाचव्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी करून संघाचा विजय निश्चित केला.
वेस्ट इंडिजने २००९ सालानंतर इंग्लंडवर मिळवलेला हा पहिला कसोटी विजय आहे. ७ चौकार व ३ षटकार खेचून ८२ धावा करणाऱ्या ब्राव्होला विजयासमीप येताच बेन स्टोकने मिड ऑफला स्टुअर्ट ब्रॉडकरवी झेलबाद केले. मात्र, पुढच्याच षटकात ब्लॅकवूडने मोईन अलीच्या गोलंदाजीवर मिड ऑनवर चौकार मारून वेस्ट इंडिजचा विजय पक्का केला. ब्लॅकवूडने १०४ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार लगावून नाबाद ४७ धावा केल्या. ब्लॅकवूडने पहिल्या डावात ८५ धावांची खेळी केली होती आणि त्यामुळेच त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
५ बाद ३९ धावांवरून चौथ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या इंग्लंडला बेन स्टोक (३२) आणि जोस बटलर (३५) यांनी सावरले. या दोघांच्या संयमी खेळीच्या जोरावर इंग्लंडने १२३ धावांपर्यंत मजल मारली आणि वेस्ट इंडिजसमोर १९२ धावांचे लक्ष्य उभे केले. जेरोम टेलर (३/३३), जेसन होल्डर (३/१५) आणि वीरास्वामी पेरामौल (३/४३) यांनी इंग्लंडचा डाव गुंडाळला. या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचीही सुरुवात निराशाजनक झाली. मोईन अली, ख्रिस जॉर्डन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांनी वेस्ट इंडिजचे ४ फलंदाज ८० धावांवर माघारी धाडले. मात्र, ब्राव्हो आणि ब्लॅकवूड या जोडीने संघाचा डाव सावरला आणि शतकी भागीदारीसह विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : सर्वबाद २५७, वेस्ट इंडिज (पहिला डाव) : सर्वबाद १८९, इंग्लंड (दुसरा डाव) : सर्वबाद १२३ (गॅरी बॅलेंस २३, बेन स्टोक ३२, जोस बटलर ३५; जेरोम टेलर ३/३३, जेसन होल्डर ३/१५, वीरास्वामी पेरामौल ३/४३), वेस्ट इंडिज (दुसरा डाव) : ५ बाद १९४ (क्रेग ब्रेथवेट २५, डॅरेन ब्राव्हो ८२, जर्मेन ब्लॅकवूड नाबाद ४७)
सामनावीर : जरमाइन ब्लॅकवूड
मालिकावीर- जेम्स अँडरसन