महिला विश्वचषकात भारतीय महिलांनी धक्कादायक खेळ करत माजी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघावर मात केली आहे. उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी मात करत रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्याचं तिकीट बूक केलं. रविवारी मिताली राजच्या टीम इंडियाची गाठ यजमान इंग्लंडच्या महिला संघाशी पडणार आहे.  भारताने दिलेल्या २८२ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन महिलांचा संघ २४५  धावांमध्ये बाद झाला. सर्व भारतीय गोलंदाजांनी आज टिच्चून मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना सामन्यात डोक वर काढायची संधीच दिली नाही. ऑस्ट्रेलियाच्या ९ विकेट माघारी परतल्यानंतर अॅलेक्स ब्लॅकवेलने अखेरच्या षटकांमध्ये मोठ्या प्रमाणात फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला, मात्र दिप्ती शर्माने तिचा त्रिफळा उडवत ६ वेळा जगज्जेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाचं पॅकअप केलं.

अखेरच्या विकेटसाठी अॅलेक्स ब्लॅकवेलनं ७६ धावांची भागीदारी केली. तिच्या ५६ चेंडुत ९० धावांच्या खेळीन भारतीय गोलंदाजांनाही काही काळ चिंतेत पाडलं होतं. मात्र दिप्ती शर्माने ब्लॅकवेलचा त्रिफळा उडवला आणि भारताचा विजय निश्चीत केला. ब्लॅकवेलने ऑस्ट्रेलियन संघाला २०० धावांचा टप्पाही पार करुन दिला.  ऑस्ट्रेलियाकडून एलिस विलानी, एलिस पेरी आणि अॅलेक्स ब्लॅकवेल या ३ फलंदाजांनीच भारतीय आक्रमणाचा नेटाने सामना केला. ब्लॅकवेलने अखेरच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांवर आक्रमण करत आपलं अर्धशतक साजरं केलं.

आजच्या महत्वाच्या सामन्यात सर्व भारतीय महिला गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. दिप्ती शर्मान सामन्यात ३ बळी घेत महत्वाची कामगिरी बजावली. तिला झुलन गोस्वामी, शिखा पांडेने प्रत्येकी २-२ तर राजेश्वरी गायकवाड आणि पुनम यादवने १-१ बळी घेत चांगली साथ दिली.

भारतीय महिलांनी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन महिला सामन्याच्या सुरुवातीपासून कधीच लयीत दिसल्या नाहीत. सलामीच्या ३ फलंदाज ३० धावांच्या आतच स्वस्तात माघारी परतल्या. मात्र त्यानंतर चौथ्या विकेटसाठी एलिस विलानी आणि एलिस पेरी यांच्यात शतकी भागीदारी झाली. यामुळे भारत हातात आलेला सामना पुन्हा गमावतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना अर्धशतकवीर एलिस विलानीला राजेश्वरी गायकवाडने स्मृती मंधनाच्या हाती झेल देत माघारी धाडलं. एलिस विलानीने ७५ धावांची खेळी केली, ज्यात १३ चौकारांचा समावेश होता. विलानी माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावाची पुन्हा एकदा घसरगुंडी उडाली.

जलदगती गोलंदाज शिखा पांडेने एलिस पेरीला माघारी धाडलं, अाणि ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला. यानंतर अवघ्या काही मिनीटांच्या अंतराने झुलन गोस्वामीने ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का देत माजी विश्वविजेत्यांना बॅकफूटवर ढकललं . लगेचच पुनम यादवने अॅशले गार्डनरला माघारी धाडलं. पाठोपाठ झुलन गोस्वामीच्या अचुक फेकीवर ऑस्ट्रेलियाची आणखी एक फलंदाज धावचीत झाली आणि ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणातली हवाच निघून गेली.

त्याआधी हरमनप्रीत कौरच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने महिला विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात २८२ धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात भारताची हिरो ठरली ती हरमनप्रीत कौर, सलामीच्या फलंदाज माघारी परतल्यानंतर हरमनप्रीतने एका बाजूने भारताची बाजू सावरुन धरत आपलं शतक साजरं केलं. हरमनप्रीतने या सामन्यात १७१ धावांची खेळी केली. तब्बल ११५ चेंडुंमध्ये २० चौकार आणि ७ षटकार खेचत हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना अक्षरशः सळो की पळो करुन सोडलं. तिला दिप्ती शर्मा, कर्णधार मिताली राज आणि वेदा कृष्णमुर्तीने चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजावर हरमनप्रीतने हल्लाबोल केला. तिच्या फटकेबाजीपुढे ऑस्ट्रेलियाच्या सर्वा गोलंदाज हतबल दिसत होत्या.

महत्वाची गोष्ट म्हणजे कर्णधार मिताली राज बाद झाल्यानंतर हरमनप्रीतने भारतीय संघाची संभावित पडझड थांबवली. दिप्ती शर्माला सोबत घेत हरमनप्रीतने भारताला सुस्थितीत आणून ठेवलं. दिप्ती शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांनी चौथ्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर हल्लाबोल चढवला. दिप्तीने हरमनप्रीतला या खेळीत चांगली साथ दिली, अखेर एलिस विलानीने दिप्ती शर्माला त्रिफळाचीत करत भारताला चौथा धक्का दिला.

त्याआधी स्मृती मंधाना आणि पुनम राऊत यांच्याकडून महत्वाच्या सामन्यातही निराशा पदरी पडली. मात्र कर्णधार मिताली राज आणि हरमनप्रीत कौरने भारताचा डाव सावरला, दोघींनीही तिसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी भारतीय संघाची धावसंख्या शंभरी पार नेल्यानंतर लगेचच कर्णधार मिताली राजचा ऑस्ट्रेलियन गोलंदाज क्रिस्टन बिम्सने त्रिफळा उडवला. मात्र त्यानंतर हरमनप्रीत कौरने दुसऱ्याच षटकात लागोपाठ एक षटकार आणि चौकार ठोकत आपलं अर्धशतक साजरं केलं. मिताली राजने ३६ धावांची खेळी केली.

त्याआधी भारताच्या सलामीवीर  स्मृती मंधाना आणि पुनम राऊत या दोन्ही फलंदाज मोठे फटके खेळण्याच्या नादात बाद झाल्या. स्मृती मंधानाने अवघ्या ६ तर पुनम राऊतने १४ धावांची खेळी केली. मेगन शूट आणि अॅशले गार्डनर या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय महिलांना माघारी धाडलं. गेल्या काही सामन्यांमध्ये भारताची सलामीची जोडी हा चिंतेचा विषय ठरत होती. त्यात आजच्या महत्वाच्या सामन्यातही सलामीच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली.

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांकडून मेगन शूट, अॅशले गार्डनर, एलिस विलानी आणि क्रिस्टन बिम्स यांना प्रत्येकी १-१ बळी मिळाला. या सामन्यात काही ठराविक प्रसंग सोडले तर भारतीय महिला फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा चांगला सामना केला.

[matchcode-to-post id=”auwinw07202017183492″]

 

  • अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी मात
  • दिप्ती शर्माने ब्लॅकवेलचा त्रिफळा उडवत, भारताला अंतिम फेरीच तिकीट मिळवून दिलं.
  • अॅलेक्स ब्लॅकवेलची शेवटच्या षटकांमध्ये चौफेर फटकेबाजी, ब्लॅकवेलचं झुंजार अर्धशतक
  • ऑस्ट्रेलियाला नववा धक्का, दिप्ती शर्माला सामन्यात आणखीन एक बळी
  • ऑस्ट्रेलियाच्या डावाची पुन्हा घसगुंडी, ८ गडी माघारी परतल्याने संघाची अवस्था बिकट
  • एलिस पेरीही शिखा पांडेच्या गोलंदाजीवर झेलबाद, ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी
  • अखेर राजेश्वरी गायकवाडने एलिस विलानीला बाद करत ऑस्ट्रेलियाची जोडी फोडली, कांगारुंचे ४ गडी माघारी
  • एलिस विलानीची चौफेर फटकेबाजी, भारतीय आक्रमणाचा नेटाने सामना करत अर्धशतक साजरं
  • एलिस विलानी आणि एलिस पेरीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला, तिसऱ्या विकेटसाठी दोघींमध्ये शतकी भागीदारी
  • सलामीच्या तीन फलंदाज स्वस्तात माघारी, झुलन गोस्वामी, शिखा पांडे आणि दिप्ती शर्माचा ऑस्ट्रेलियन संघाला दणका
  • भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अडखळती सुरुवात
  • भारताचं ऑस्ट्रेलियासमोर २८२ धावांचं आव्हान, हरमनप्रीत कौरच्या १७१ धावा
  • हरमनप्रीत कौरचा एका बाजूने ऑस्ट्रेलियावर हल्लाबोल सुरुच, अखेरच्या षटकात वेदा कृष्णमुर्तीची फटकेबाजी
  • एलिस विलानीने भारताची जमलेली जोडी फोडली, दिप्ती शर्मा बाद
  • हरमनप्रीतचा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्लाबोल, मैदानात चौफेर फटकेबाजी
  • चौथ्या विकेटसाठी हरमनप्रीत आणि दिप्ती शर्माची शतकी भागीदारी
  • एका बाजूनं भारताचा डाव सावरत हरमनप्रीत कौरचं शतक
  • दिप्ती शर्माच्या सोबतीने हरमनप्रीत कौरची चौथ्या विकेटसाठी पुन्हा अर्धशतकी भागीदारी
  • हरमनप्रीत कौरचं एकाच षटकात लागोपाठ षटकार आणि चौकार ठोकत अर्धशतक साजर
  • धावसंख्या शंभरी पार गेल्यानंतर कर्णधार मिताली राज माघारी, भारताला तिसरा धक्का
  • तिसऱ्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांची ६६ धावांची भागीदारी
  • मिताली राज आणि हरमनप्रीत कौरने भारताचा डाव सावरला
  • मोठा फटका खेळण्याच्या नादात पुनम राऊत अॅशे गार्डनरच्या गोलंदाजीवर बाद
  • मिताली राजने पुनम राऊतच्या मदतीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला
  • महत्वाच्या सामन्यात भारताची पुन्हा एकदा अडखळती सुरुवात, सलामीवीर स्मृती मंधाना बाद
  • पावसाचा खेळ संपल्यानंतर पंचांकडून मैदानाची पाहणी, सामना ४२ षटकांचा खेळवण्याचा निर्णय
  • दुसऱ्या उपांत्य सामन्यात पावसाचा व्यत्यय, सामना सुरु होण्यासाठी उशीर