‘पुणे, मुंबई उपनगर लय भारी, घडणार त्यांना दुबईवारी’ या बातमीने मार्च २०१३मध्ये सर्वाचे लक्ष वेधले होते. छत्रपती शिवाजी करंडक कबड्डी स्पध्रेत विजेतेपदावर नाव कोरण्याची किमया साधलेल्या पुणे आणि मुंबई उपनगर संघाला जाहीर झालेल्या आश्चर्यकारक दौऱ्याचे इनाम कबड्डीविश्वासाठी जणू पर्वणीच होते. काही महिन्यांपूर्वी उपनगरने दुबईवारीचा आनंद लुटला असला तरी खेळाडू आणि प्रशासकांच्या अनास्थेमुळे पुण्याच्या महिला संघाचे हे स्वप्न गेली दोन वष्रे अधुरेच राहिले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी करंडक कबड्डी स्पध्रेचे यजमानपद २०१३मध्ये कोल्हापूरने समर्थपणे सांभाळले होते. कोल्हापूरशी नाते सांगणारे तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी या स्पध्रेचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलण्यासाठी आपली आर्थिक आणि राजकीय ताकद पणाला लावली होती. या स्पध्रेतील पारितोषिकांच्या शासकीय जमाखर्चाव्यतिरिक्त दोन्ही गटांमधील मालिकावीर पुरस्कारासाठी दुचाकी देण्यात आली. ती ठाण्याच्या जितेश जोशी आणि पुण्याच्या दीपिका जोसेफने पटकावली. याशिवाय सतेज पाटलांनी विजेत्या संघांना दुबईची सफर घडवण्याचे ऐलान केले. ते इतक्यावरच थांबले नाहीत, तर स्पर्धा संपताच पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन यांना पाटील यांची दुबईच्या दौऱ्यासंदर्भातील पत्रेही आली. परंतु त्याचे गांभीर्य कुणालाही समजले नाही. खेळाडू आपल्या स्पर्धामध्ये मग्न राहिले आणि प्रशासक आदी मंडळी आपल्याला पुढील सूचना देतील, या आशेवर राहिले. अखेर सहा महिन्यांपूर्वी जाग आलेल्या उपनगर कबड्डी असोसिएशनने दुबईची सफर केली. परंतु पुणे कबड्डी संघाकडून मात्र अद्याप याबाबत दिरंगाई होत आहे.
स्पर्धा संपल्यावर सतेज पाटील यांचे दुबई दौऱ्यासंदर्भातील पत्र आल्यानंतर १२ खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक अशा १४ जणांना उपनगर कबड्डी असोसिएशनचे तत्कालीन सरचिटणीस गणेश कदम यांनी पासपोर्ट संदर्भातील माहिती देण्यास सांगितले होते. परंतु त्यावेळी त्यांच्या एकाही खेळाडूने आपली माहिती सादर केली नव्हती. मात्र ऑक्टोबर २०१४मध्ये उपनगर कबड्डी संघाने योजनापूर्वक प्रक्रिया पूर्ण करून दुबई सफर केल्याची माहिती उपनगर कबड्डीचे कार्यकारिणी सदस्य प्रताप शिंदे यांनी दिली.
याबाबत पुणे संघाचे तत्कालीन प्रशिक्षक राजा ढमढेरे म्हणाले, ‘‘पुणे कबड्डी असोसिएशनकडून खेळाडूंना पासपोर्टची माहिती सादर करण्यासंदर्भात सूचना देण्यात आली होती. परंतु ती प्रक्रिया पूर्ण करण्यात संघाने ढिलाई दाखवली. मात्र आता संधी असल्यास प्रक्रिया पूर्ण करून आम्ही दुबई सफरीवर जरूर जाऊ.’’