थिरूश कामिनीने साकारले भारतातर्फे विश्वचषकातील पहिले शतक
वीरेंद्र सेहवागने २०११च्या विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात शतक झळकावत विजयी सलामी दिली, त्यानंतर भारताने विश्वचषक जिंकून सुवर्णाध्याय लिहिला होता.  पुरुषांच्या क्रिकेटचा हाच कित्ता भारताच्या महिलांनी गिरवला. विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात सलामीवीर थिरूश कामिनीच्या शानदार शतकाच्या बळावर भारताने विजयाचा श्रीगणेशा केला. आता विश्वविजयाचा सुवर्णाध्याय महिला संघाने लिहावा, अशी करोडो भारतीयांची इच्छा असेल.
थिरूश कामिनीचे शतक आणि पूनम राऊतच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २८४ धावा उभारल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव १७९ धावांत संपुष्टात आला आणि भारताने १०५ धावांनी सामना सहजपणे जिंकला.
नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने भारताला फलंदाजीला पाचारण करत आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला. पूनम आणि थिरूशकामिनी यांनी १७५ धावांची विक्रमी सलामी देत वेस्ट इंडिजची गोलंदाजी निष्प्रभ केली. पूनमने ७ चौकारांच्या जोरावर ७२ धावांची खेळी साकारली, तर थिरूश कामिनीने ११ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १०० धावांची खेळी साकारत भारताला विजयाचा पाया रचून दिला.
२८५ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची अडखळत सुरुवात झाली आणि त्यांना १७९ धावांपर्यंतच मजल मारता आली. डिएन्ड्रा डॉटिनने ४ षटकार ३ चौकारांच्या जोरावर १६ चेंडूंत ३९ धावांची खेळी साकारली, तर झुलन गोस्वामीने यावेळी फक्त १३ धावांत २ बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक
भारत : ५० षटकांत ६ बाद २८४ (थिरूश कामिनी १००, पूनम राऊत ७२; डिएन्ड्रा डॉटिन ३/३२) पराभूत वि. वेस्ट इंडिज : ४४.३ षटकांत सर्व बाद १७९ (डिएन्ड्रा डॉटिन ३९; झुलन गोस्वामी २/१३)
सामनावीर : थिरूश कामिनी.

सुन्या सुन्या मैफिलीत..
मुंबई : महिला विश्वचषकाचा पहिला सामना आणि तोही भारतातील क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या मुंबईत खेळला जात असला तरी ‘दर्दी’ म्हणवणाऱ्या मुंबईकरांनी या सामन्याकडे पाठच फिरवली. मुंबईकर फलंदाज पूनम राऊत आणि थिरूश कामिनी यांनी नेत्रदीपक फलंदाजी करत चांगली मैफल सजवली होती, पण प्रेक्षकांच्या कमी पाठिंब्यामुळे ती सुनी, सुनीच ठरली. महिलांचा विश्वचषक सुरू होतोय, हे मुंबईतील सर्वसामान्यांना ज्ञातच नाही आणि इथेच आयसीसी आणि बीसीसीआय कमी पडल्याचे बोलले जात आहे. ज्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना होता, त्या मैदानाबाहेरही विश्वचषकाची कोणतीच जाहिरात नव्हती. सामना सर्व सामान्यांसाठी मोफत असतानाही प्रेक्षक फिरकले नाहीत, यावरूनच देशात क्रिकेट डोक्यावर घेतले जात असले तरी महिला क्रिकेटची उपेक्षा प्रेक्षकांकडूनही होत असल्याचे जाणवते. शाळांमधील मुलांना बोलवून स्टेडियममधील काही जागा भरल्या गेल्या, पण पूर्व आणि पश्चिम स्टँड्स पूर्णपणे रिक्त होते.