२० जणींच्या या संघात पाच खेळाडू मुंबईचे होते. हा आकडा दिलासादायक असला तरी महिला फुटबॉलबाबत मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनमध्ये (एमडीएफए) असलेली उदासीनता लपणारी नाही. एमडीएफएतर्फे वर्षांतून महिलांसाठीच्या एकच फुटबॉल स्पध्रेचे आयोजन करण्यात येत असल्याची वस्तुस्थिती समोर आहे.
१५ वर्षांखालील राष्ट्रीय स्पध्रेसाठी निवडण्यात आलेल्या या मुंबईच्या खेळाडूंची निवड मुंबई शालेय क्रीडा असोसिएशनच्या स्पर्धाच्या आधावर करण्यात आलेली आहे. त्यामुळे शालेय क्रीडा असोसिएशनने दिलेल्या आकडेवारीवरून निवडक मुलींना संधी मिळाली. राज्य संघाच्या निवड प्रक्रियेत एमडीएफएचा कोणताही हस्तक्षेप नसला तरी महिला फुटबॉलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्याकडून कोणतीच पावले उचलली जात नसल्याचे बोलण्यात येत आहे. कनिष्ठ स्तरावर एमडीएफए शालेय असोसिएशनवर, तर वरिष्ठ स्तरावर विविध क्लब आणि कंपन्यांवर अवलंबून आहेत.
वर्षांच्या सुरुवातीला एका स्पध्रेचे आयोजन करायचे आणि त्यातून विजेता मिळवायचा, ही औपचारिकता गेली कित्येक वर्षे एमडीएफएकडून पार पाडली जात आहे. या स्पध्रेची संघ संख्या निश्चित नसते, कधी १२ तर कधी १७ संघ खेळतात, परंतु यंदा विविध कारणे देत केवळ १० संघांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे महिला खेळाडूंसाठी एमडीएफएकडे ठोस धोरण नाही. स्पध्रेतील संघांच्या सहभागाबाबत एमडीएफएचे माजी सचिव आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सचिव साऊटर वाझ म्हणाले, ‘‘अनेक वर्षे आम्ही या स्पध्रेचे आयोजन करत आहोत. ही स्पर्धा वर्षांच्या सुरुवातीला घेण्यात येत असल्याने अनेकदा विविध कारणास्तव संघ माघार घेतात. त्यामुळे जमतील तितक्या संघांमध्ये ही स्पर्धा खेळविली जाते.’’

आम्ही वर्षांच्या सुरुवातीला महिलांची फुटबॉल स्पर्धा घेतो, परंतु त्यातही संघांच्या सहभागाची संख्या निश्चित नसते. त्यामुळे उपलब्ध संघांमध्ये ही स्पर्धा आम्ही घेतो. ही संख्या निश्चित व्हावी आणि जास्तीत जास्त महिला संघांचा सहभाग वाढावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
उदयन बॅनर्जी, सचिव एमडीएफए
कनिष्ठ गटांच्या स्पर्धाचे काय?
कनिष्ठ गटाच्या मुलांच्या आणि मुलींच्या स्पर्धा होत नसल्याने अनेक होतकरू खेळाडू शालेय स्तरानंतर फुटबॉल सोडून देतात. व्यासपीठच उपलब्ध नसल्याने त्यांना हे पाऊल उचलावे लागते. एमडीएफएतर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धात काहींना खेळण्याची संधी मिळत असली तरी त्यातून काहीच साध्य होताना दिसत नाही. त्यामुळे कनिष्ठ स्पर्धाचे आयोजन व्हावे, असा मतप्रवाह एमडीएफएमध्ये आहे.