भारताने मलेशियाविरुद्धचा सहावा कसोटी सामना ५-२ अशा फरकाने जिंकला आणि या दोन संघांमधील हॉकी कसोटी मालिकेत ६-० असे निर्भेळ यश मिळविले.
भारताने सहा सामन्यांच्या या मालिकेतील प्रत्येक सामन्यात अव्वल दर्जाचा खेळ करीत विजय मिळविला. चौथा सामना जिंकून त्यांनी मालिका विजय निश्चित केला होता. पूनम राणीने मंगळवारच्या सामन्यात तिसऱ्याच मिनिटाला भारताचे खाते उघडले. त्यानंतर १४ व्या मिनिटाला सुनीता लाक्राने पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करीत संघाचा दुसरा गोल नोंदविला. २१ व्या मिनिटाला मलेशियाने गोल करीत ही आघाडी कमी केली; तथापि २८ व्या मिनिटाला भारताच्या अनुराधा कुमारी हिने भारतास ३-१ असे आघाडीवर नेले. रितुशा आर्याने ३४ व्या व ३५ व्या मिनिटाला गोल करीत भारताची बाजू आणखीनच बळकट केली. पूर्वार्धात ५-१ अशी आघाडी घेतल्यामुळे भारताचा विजय निश्चित झाला होता. उत्तरार्धात मलेशियाने एक गोल करण्यात यश मिळविले, मात्र त्यानंतर त्यांच्या चाली असफल ठरल्या.
भारताची कर्णधार रितू राणीने सामना संपल्यानंतर सांगितले, ही मालिका आम्ही एकतर्फी जिंकल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. आमच्या खेळाडूंनी अतिशय आत्मविश्वासाने व सातत्यपूर्ण खेळ केला. निर्विवाद यशामुळे आगामी राष्ट्रकुल स्पर्धेसाठी आमचे मनोधैर्य उंचावले आहे. तेथेही आम्ही सर्वोत्तम कामगिरी करीत सोनेरी यश मिळवू, अशी मला खात्री आहे.