विश्वचषकाची दणक्यात सुरुवात केल्यानंतर भारतीय संघाचा विजरथ दक्षिण आफ्रिकेने रोखला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताला मोठ्या फरकाने पराभूत केले. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी करत भारतीय संघ सावरला. प्रत्येक सामन्यात वेगळ्या रणरागिणींच्या खेळाने भारतीय संघाची स्पर्धेतील दावेदारी हळूवार भक्कम होत असल्याची जाणीव झाली. भारतीय संघाचा हा आत्मविश्वास कांगारुंसमोर टिकणार का? हा मोठा प्रश्न होता. ज्या संघाने २००५ मध्ये भारताच्या विश्वचषक विजयाच्या स्वप्नाला सुरुंग लावला होता. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीची जोडी तंबूत परतली आणि कांगारु पुन्हा भारतीयांसमोर भारी पडणार अशी भीती निर्माण झाली. मात्र पंजाबी कुडी हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियन महिलांच्या अक्षरश: नाकी नऊ आणले. २००९ मध्ये पाकिस्तान विरुद्ध पदार्पण करणाऱ्या हरमनप्रीत कौरने भारताला सावरलेच नाही तर सहा वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून पॅकअप करायला भाग पाडले. उपांत्य सामन्यात झळकावलेल नाबाद शतक हे हरमनप्रीतच्या कारकिर्दीतील तिसरे शतक ठरले.

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत हरमनप्रीतची कामगिरी फारशी लक्षवेधी ठरताना दिसत नव्हती. आतापर्यंत झालेल्या आठ सामन्यात तिने एका अर्धशतकाच्या जोरावर अवघ्या १३७ धावा केल्या होत्या. यात इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात २४ धावा आणि १ विकेट, वेस्ट इंडीज विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तिला फलंदाजीच मिळाली नाही. या सामन्यात तिने दोन बळी मिळवत संघाच्या विजयात थोडेफार योगदान दिले. त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध तिला १० धावा आणि एक बळी टिपण्यात यश आले. श्रीलंकेविरुद्ध हा आकडा फक्त १० धावांनी सुधारला १ विकेट्ससह तिने या सामन्यात २० धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेत दोन विकेट्स मिळवल्या मात्र या सामन्यात तिला खाते ही उघडता आले नाही. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने केवळ २३ धावांचे योगदान दिले होते. त्यानंतर मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत लयीत खेळताना दिसली. उपांत्यपूर्व फेरीतील या सामन्यात तिने दमदार ६० धावांची अर्धशतकी खेळी केली.

हरमनप्रीत कौरच्या आजच्या शतकाला विशेष महत्त्व आहे. कारण या शतकाने भारताचं विश्वचषक विजयाच स्वप्न जिवंत ठेवलंय. आघाडीची फळी कोलमडल्यानंतर ज्या दिमाखात तिने कांगारुंचा सामना केला. क्रिकेट चाहत्याच्या नेहमीच स्मरणात राहिलं. उपांत्य सामन्यात हरमनप्रीतने २० चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी करत कांगारुंच्या गोलंदाजांना हतबल केले. शतकाच्या जवळ आल्यानंतर पायात आलेल्या गोळ्यांनी शतक पूर्ण करतानाची तिने घेतलेली धाव ही काळजाचा ठोका चुकवणारी अशी होती. कारण तिच्याशिवाय भारतीय डावाची नौका पार होणार नाही, एवढी समज क्रिकेट पाहणाऱ्याला नक्कीच आली होती. तिनेही क्रिकेट चाहत्यांना निराश केले नाही. अखेरच्या षटकात तुफान फलंदाजी करत भारतीय संघाला विजयासाठी आशादायी धावसंख्या उभारुन ती नाबाद मागे फिरली. इतिहासाच्या दिशेने वाटचाल करताना अखेरपर्यंत मैदानात थांबून कांगारुंना बाद करणाऱ्या हरमनप्रीतचे शतक ना ऑस्ट्रेलिया विसरेल ना तिचा भारतीय क्रिकेट चाहता. थँक्यू हरमनप्रीत अॅण्ड बेस्ट लक फॉर फायनल!