नरसिंगबरोबरच्या चाचणीसाठी कुस्ती महासंघाचा नकार
रिओ येथील ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याचे सुशीलकुमार याचे स्वप्न अपुरे राहण्याचीच चिन्हे आहेत. सुशीलकुमार व नरसिंग यादव यांच्यात चाचणी घेण्यासाठी भारतीय कुस्ती महासंघाने नकार दिला आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या नरसिंगलाच त्यांनी प्राधान्य दिले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने सुशीलच्या अर्जावर निर्णय देताना कुस्ती महासंघाला याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार महासंघाच्या विशेष समितीने सुशीलशी सविस्तर चर्चा केली. ऑलिम्पिकमधील ७४ किलो गटात प्रतिनिधित्व करण्याची संधी नरसिंगलाच देण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंग यांनी सांगितले, ‘समितीपुढील चर्चेत सुशीलने सुरुवातीपासूनच ऑलिम्पिकसाठी चाचणी घेण्याचा आग्रह धरला होता. समितीने सुशील याच्या आजपर्यंतच्या कामगिरीचे कौतुक केले. मात्र नरसिंगने जागतिक स्पर्धेसारख्या आव्हानात्मक स्पर्धेत कांस्यपदक मिळविले आहे व त्याद्वारे त्याने ऑलिम्पिक प्रवेशिका प्राप्त केली आहे. त्याचे हे यश निश्चितच आदरयुक्त आहे व त्याच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जर त्याला ऑलिम्पिकची संधी दिली नाही तर त्याच्यावर अन्याय केला जाईल असे समितीने मत व्यक्त केले.’
ब्रिजभूषण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला वरिष्ठ उपाध्यक्ष आय. डी. नानावटी यांच्याबरोबरच सुशीलकुमार व त्याचे प्रशिक्षक सतपाल हे उपस्थित होते. ब्रिजभूषण यांनी सांगितले, ‘ही चर्चा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झाली. आम्ही सुशील व सतपाल या दोघांनाही त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली. एका गटासाठी चाचणी घेतली तर अन्य गटांतील खेळाडूही चाचणीसाठी आग्रह धरतील व त्यामुळे महासंघापुढील समस्या वाढण्याची शक्यता आहे हे आम्ही सुशील व सतपाल यांना पटवून दिले. आम्ही जो काही निर्णय घेत आहोत, ती माहिती आम्ही न्यायालयाला उत्तरात देणार आहोत.’
दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी २७ मे रोजी करणार आहे. न्यायालयाने अंतिम निर्णय घेण्यास महासंघाला सांगितले तर तुम्ही काय कराल, असे विचारल्यावर ब्रिजभूषण यांनी सांगितले की, ‘आम्ही आमचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यावर आम्ही ठाम राहणार आहोत.’
आठ महिन्यांपूर्वी नरसिंगने विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकत ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवला होता. पण त्यावेळी जर सुशील आणि महासंघ यांच्यामध्ये काही चर्चा झाली होती का, अस विचारल्यावर ब्रिदभूषण म्हणाले की, ‘ याबाबत सुशीलची आणि आमची कसलीही चर्चा यापूर्वी झाली नव्हती. महासंघ चाचणी घेईल, असे आम्ही कधीही म्हणालो नव्हतो. प्रसारमाध्यमांतून सातत्याने आम्हाला याबाबत विचारले जात होते. पण मी त्यावेळी काहीही बोललो नाही. कारण त्यावेळी बोलण्यामुळे कुस्तीमधील वातावरण बिघडले असते, खेळाडूंच्या सरावावर त्याचा विपरीत परीणाम होऊ शकला असता. त्यामुळे योग्यवेळीच आम्ही ही गोष्ट मांडली आहे.’
ते पुढे म्हणाले की, ‘जर उच्च न्यायालयाने चाचणी घेण्यास सांगितले तर हे प्रकरण थांबणार नाही. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये जाईल. पण जर सर्वोच्च न्यायालयानेही चाचणी घेण्यास सांगितले तर आम्हाला चाचणी घ्यावी लागेल.’

ठळक मुद्दे
* कोणतीही चाचणी घेणार नसून नरसिंगलाच ऑलिम्पिकसाठी पाठवण्याची महासंघाची भूमिका
* उच्च न्यायालयात २७ मे रोजी होणार सुनावणी
* न्यायालयाने महासंघावर अंतिम निर्णय सोपवल्यास नरसिंग ऑलिम्पिकला जाणार
* उच्च न्यायालयाने चाचणी घेण्यास सांगितले तर सर्वोच्च न्यायालयात प्रकरण जाणार
* सर्वोच्च न्यायालयाने चाचणी घेण्यास सांगितले तर महासंघ तयार

नरसिंग यादव हा मला भावासारखा आहे आणि त्याचे चांगले व्हावे, अशी भावना मी नेहमी व्यक्त करत असतो. त्याने आतापर्यंत देशासाठी चांगली कामगिरी केली आहे. पण परिस्थितीच अशी आहे की, काही गोष्टी कराव्या लागत आहेत. माझ्यामते ७४ किलो वजनी गटासाठी चाचणी घेण्यात यावी आणि त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये कोणाला पाठवायचे, याचा निर्णय घ्यायला हवा.
– सुशील कुमार,
ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू