इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेपाठोपाठ किदम्बी श्रीकांतने आपला विजयी धडाका, जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतही कायम ठेवला आहे. पहिल्या फेरीत श्रीकांतचा सामना हा रशियाच्या सर्गेई सिरांत सोबत होता. मात्र संपूर्ण सामन्यात रशियन प्रतिस्पर्ध्याकडून श्रीकांतला जरासाही प्रतिकार झाला नाही. त्यामुळे आपल्या प्रतिस्पर्ध्यावर २१-१३, २१-१२ अशी मात करत श्रीकांतने एकेरी सामन्यात भारताला पहिला विजय मिळवून दिला आहे.

पहिल्या सेटमध्ये श्रीकांतने अपेक्षित खेळ करत आघाडी घेतली होती. श्रीकांतच्या आक्रमक खेळाचं उत्तर सर्गेईकडे नव्हतं. त्यामुळे श्रीकांतसाठी हा सामना फक्त औपचारिकता ठरणार असचं वाटत होतं. याचप्रमाणे पहिल्या सेटच्या मध्यंतरापर्यंत श्रीकांतकडे ११-६ अशी आघाडी होती. आपला हाच फॉर्म कायम ठेवत श्रीकांतने सर्गेईला सामन्यात डोकं वर काढण्याची संधी न देता पहिला सेट २१-१३ असा आपल्या खिशात घातला.

पहिल्या सेटमधल्या पराभवानंतर रशियन खेळाडूच्या मैदानातल्या आत्मविश्वासावर परिणाम झालेला पहायला मिळाला. श्रीकांतच्या स्मॅश, ड्रॉप यासरख्या फटक्यांपुढे सर्गेई सिरांत हतबल ठरत होता. दुसऱ्या सेटच्या सुरुवातीला सर्गेईने श्रीकांतला टक्कर देण्याचा प्रयत्न करत सामन्यात बरोबरी साधली खरी, मात्र तिकडून आघाडी घेणं त्याला काही जमलं नाही. श्रीकांतने दुसऱ्या सेटमध्ये पुन्हा एकदा बाजी मारत सेट २१-१२ अशा फरकाने जिंकला. इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियान ओपन स्पर्धेतं विजेतेपद पकडून श्रीकांतचा हा सलग ११ वा विजय ठरला.

याआधी भारताच्या आश्विनी पोनप्पा आणि सुमीत रेड्डी या मिश्र दुहेरी जोडीला पहिल्या फेरीत प्रतिस्पर्धी संघाकडून ‘बाय’ मिळाला आहे. त्यामुळे कोणताही सामना न खेळता भारताच्या मिश्र दुहेरी जोडीने पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.