जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी आपला विजयी धडाका कायम ठेवला आहे. पहिल्या फेरीत आपल्या रशियन प्रतिस्पर्ध्यावर मात करणाऱ्या श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत फ्रान्सच्या ल्युकास कोरवीशी सामना झाला. २१-९, २१-१७ अशा फरकाने सामना जिंकत श्रीकांतने पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.

आपल्या पहिल्या सामन्यात श्रीकांतला प्रतिस्पर्धी खेळाडूकडून फारसा प्रतिकार करावा लागला नाही. मात्र या सामन्यात फ्रान्सच्या ल्युकासने श्रीकांतला चांगली लढत दिली. तुलनेने पहिल्या सेटमध्ये श्रीकांतने ल्युकासवर वर्चस्व गाजवत पहिला सेट २१-९ अशा फरकाने आपल्या खिशात घातला. श्रीकांतच्या झंजावाती खेळापुढे ल्युकासचा पहिल्या सेटमध्ये काही निभावच लागला नाही.

मात्र दुसऱ्या सेटमध्ये ल्युकासने अनपेक्षितपणे पुनरागमन श्रीकांतला कडवी टक्कर दिली. दुसऱ्या सेटच्या सुरुवातीपासूनच ल्युकासने श्रीकांतला बरोबरीत रोखलं होतं. कोर्टच्या दोन्ही बाजूला फटके खेळत ल्युकासने श्रीकांतची चांगलीच परीक्षा घेतली. मात्र श्रीकांतने वेळेत स्वतःला सावरत सामन्यात ७-३ अशी आघाडी घेतली. मात्र यानंतर ल्युकासने सामन्यात पुन्हा मुसंडी मारत श्रीकांतची आघाडी कमी करत अवघ्या २ गुणांवर आणून ठेवली. यानंतर प्रत्येक वेळी ल्युकासने श्रीकांतला बॅकफूटवर ढकलत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेरच्या क्षणांमध्ये श्रीकांतने आपला सर्व अनुभव पणाला लावत दुसऱ्या सेटसह सामनाही जिंकला.

दुसरीकडे महिलांच्या एकेरी सामन्यात भारताची फुलराणी सायना नेहवालनेही पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. सायनाने स्वित्झर्लंडच्या सब्रिना जॅकेटचा सरळ दोन सेटमध्ये २१-११, २१-१२ असा फडशा पाडला. पहिल्या फेरीत सायना नेहवालच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने माघार घेतल्यामुळे सायनाला थेट पुढच्या फेरीत प्रवेश मिळाला होता. याआधी २०१२ साली लंडन ऑलिम्पिक खेळांमध्येही सायनाने सब्रिना जॅकेटवर मात केली होती. पुढच्या फेरीत सायनाची गाठ कोरियाच्या सुंग जी ह्यूनशी पडण्याची शक्यता आहे.

याव्यतिरीक्त बी. साई प्रणितने आपल्या प्रतिस्पर्ध्याची झुंज मोडून काढत पुढच्या फेरीत प्रवेश केला. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये भारताचे खेळाडू कशी कामगिरी करतात हे पहावं लागणार आहे.