बिलियर्ड्स आणि स्नूकर खेळातील भारताचा अव्वल खेळाडू पंकज अडवाणी याने जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेत १५० गुणांच्या प्रकारात जेतेपद पटकावत आपल्या खात्यात आणखी एक जागतिक जेतेपदाची भर घातली आहे.
‘‘मी सध्या ‘सातवे आसमाँ पर’ आहे. या स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मी भारतात आलो होतो, त्याचा फायदा मला झाला. या स्पर्धेत पीटर गिलख्रिस्ट हा तगडा प्रतिस्पर्धी माझ्यासमोर होता. पण जेतेपद पटकावल्यामुळे मी सध्या खूश आहे,’’ असे ११वे जागतिक जेतेपद पटकावल्यानंतर अडवाणीने सांगितले. बिलियर्ड्सच्या या झटपट प्रकारात अडवाणीने अंतिम फेरीत सिंगापूरच्या पीटर गिलख्रिस्टचा ६-२ असा पराभव करून देशाला दिवाळीची भेट दिली. या वर्षांत अडवाणीने आयबीएसएफ जागतिक ६-रेड स्नूकर, जागतिक सांघिक बिलियर्ड्स आणि जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद (गुण प्रकार) या तीन वेगवेगळ्या प्रकारांत जागतिक जेतेपदांची कमाई केली.