नॉर्वेचा जगज्जेता मॅग्नस कार्लसनविरुद्धच्या जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या विश्वनाथन आनंदला आता गुरुवारी होणाऱ्या नवव्या फेरीत खडतर परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. एका गुणाने पिछाडीवर पडल्यानंतर आता शिल्लक राहिलेल्या चार फेऱ्यांमध्ये आनंदला दमदार कामगिरी करावी लागणार आहे. अन्यथा सलग दुसऱ्यांदा जगज्जेता होण्याची आनंदची संधी मुकणार आहे.
कार्लसनने आठव्या फेरीअखेर ४.५-३.५ अशी आघाडी घेतली आहे. सहाव्या डावातील विजय कार्लसनसाठी निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एका गुणाने मागे असल्यामुळे आनंदसमोरील दडपणात वाढ झाली आहे. जर पुढील दोन सामन्यांत आनंदने विजय मिळवला नाही, तर त्याच्यासाठी पुढील परिस्थिती अवघड होऊन बसणार आहे.
कार्लसनची तयारी आनंदसाठी चिंतेची बाब ठरली आहे. तिसऱ्या डावात आनंद ज्या पद्धतीने तयारी करून आला होता, तशाच कल्पना आनंदला राबवाव्या लागतील. कोणत्याही चुका न करण्याच्या क्षमतेसह कार्लसन शेवटच्या टप्प्यात धोका पत्करणार नाही. जगज्जेतेपद कायम राखण्यासाठी त्याला पुढील चारही डाव बरोबरीत राखण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कार्लसनला चुका करण्याची परिस्थिती आनंदला निर्माण करावी लागेल. आनंदची ‘सपोर्ट टीम’ नव्या कल्पनेचा विचार करत आहे. गुरुवारी होणाऱ्या नवव्या फेरीत आनंदला काळ्या मोहऱ्यांसह खेळावे लागणार आहे. याचा अर्थ, पुढील दोन दिवसांत त्याला काहीतरी करिश्मा करून दाखवावा लागणार आहे.