अयोनिका पॉल, आंतराष्ट्रीय नेमबाज
मी मुंबईतच नेमबाजीची मुळाक्षरे गिरवली. वरळी येथील महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या रेंजवरच मी पहिल्यांदा रायफल हातात घेतली. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्यानंतर मुंबईत जागतिक दर्जाच्या शूटिंग रेंजची उणीव भासते. प्रत्येक वेळी सरावासाठी बालेवाडी केंद्रात जावे लागले. मुंबईतच अशी सुविधा उपलब्ध झाल्यास प्रवासाचा वेळ, ऊर्जा वाचेल आणि सरावाला जास्त वेळ देता येईल. ग्लासगो, स्कॉटलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मुंबईकर अयोनिका पॉलने १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदकावर नाव कोरले. नेमबाजीत कारकीर्द घडवायची ठरवल्यानंतर अल्पावधीतच राष्ट्रकुल पदकासह भरारी घेणाऱ्या अयोनिकाने गेल्या महिन्यात मारिबोर, स्लोव्हेनिया येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकात कांस्यपदकाची कमाई केली होती. ग्लासगोहून परतल्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेचा अनुभव, जलतरण ते नेमबाजी हे स्थित्यंतर, प्रोत्साहनाची आवश्यकता याबाबत अयोनिकाने ‘लोकसत्ता’शी केलेली बातचीत.
* ज्या वेळी पदक पटकावलेस त्या क्षणाचे कसे वर्णन करशील?
त्या क्षणी देशासाठी पदक जिंकता आल्याने प्रचंड आनंद झाला. अपूर्वी चंडेलाला सुवर्णपदक मिळाल्याने तिरंगा फडकला आणि राष्ट्रगीत सुरू झाले. तो क्षण अविस्मरणीय होता. देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करता आल्याचे समाधान वाटले. पात्रता फेरीत माझी कामगिरी मनासारखी झाली नव्हती. मात्र अंतिम फेरीत मी शिस्तबद्ध प्रयत्न केले. माझ्याबरोबर अपूर्वी ही मैत्रीणही खेळत होती. सुवर्णपदक कोणालाही मिळू शकत होते. शेवटच्या तीन प्रयत्नांत मी थोडे कमी पडले आणि सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. मात्र दुसरे स्थान मिळवल्याने रौप्यपदक नावावर केले होते.
* जलतरण ते नेमबाजी हे स्थित्यंतर कसे झाले?
माझे वडील जलतरण प्रशिक्षक आहेत. त्यामुळे जलतरणाचा वसा घरातूनच मिळालेला होता. शालेय स्तरावर वयोगट स्पर्धामध्ये मी सातत्याने सहभागी होत होते आणि यशही मिळवत होते. उन्हाळी सुट्टीदरम्यान नेमबाजी प्रशिक्षणाला सुरुवात केली. रायफल, पेटल्स, लक्ष्य भेदल्यानंतरचा आवाज हे वातावरण मला नवीन होते. मात्र हळूहळू त्याची गोडी लागली. संजय चक्रवर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीचा श्रीगणेशा केला. नेमबाजीच्या स्पर्धामध्ये सहभागी होऊ लागले. याच खेळात कारकीर्द करावी असे वाटले आणि जलतरण मागे पडले.
* नेमबाजी हा महागडा खेळ असल्याने आर्थिक बाजू कशी सांभाळतेस?
नेमबाजासाठी लागणारी रायफल, किट, शूज या सगळ्याची किंमत काही लाखांत आहे. माझ्या घरच्यांच्या सर्वतोपरी सहकार्यामुळेच या खेळाची आवड जोपासू शकले. मात्र मध्यमवर्गीय कुटुंबाला मर्यादा असतात. परदेशी प्रशिक्षण, प्रवास यासाठी भरपूर पैसा लागतो. ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट संघटनेच्या मदतीमुळे माझे काम सोपे झाले असून मी फक्त खेळावर लक्ष केंद्रित करते. सराव-प्रवास-निवास व्यवस्था, उपचार या सगळ्या गोष्टी ही संघटना पाहते. मी आतापर्यंत केलेल्या वाटचालीत ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट संघटनेसाठी कार्यरत क्रीडावैद्यकशास्त्र तज्ज्ञ निखिल लाटये आणि क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ वैभव आगाशे यांची भूमिका महत्त्वाची आहे.
*आंतरराष्ट्रीय नेमबाजपटूंसाठी मुंबईत असलेल्या सुविधांबाबत काय सांगशील?
मुंबईत आता अनेक शूटिंग रेंज आहेत. मात्र मुंबईत आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि त्याच्या सरावासाठी जागतिक दर्जाच्या शूटिंग रेंजची आवश्यकता आहे, असे केंद्र मुंबईत नाही. अभिनव बिंद्राच्या ऑलिम्पिक सुवर्णपदकानंतर नेमबाजीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. रेंज मर्यादित आहेत आणि नेमबाजांची संख्या वाढते आहे. त्यामुळे प्रत्येकाला सरावाला फारच कमी वेळ मिळतो. आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या नेमबाजांसाठी ही अनुकूल परिस्थिती नाही. मी सरावासाठी पुण्याजवळच्या बालेवाडी येथील केंद्रात जाते. मुंबईत अशा केंद्राची निर्मिती झाल्यास वेळ वाचेल, सरावाला जास्त वेळ देता येईल.
* स्पर्धा, सराव, प्रवास यामुळे खेळाडूंचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. मात्र तू याला अपवाद आहेस? खेळ आणि अभ्यास यांचा समतोल कसा साधतेस?
वेळ व्यवस्थापन आणि शिस्त या दोन गोष्टींचे मी काटकोरपणे पालन करते. शाळेत असल्यापासून मी खेळते आहे. विवेकानंद हायस्कूल ही माझी शाळा आणि पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालय या दोन्ही संस्थांच्या सकारात्मक भूमिकेमुळे मी खेळ आणि अभ्यास यांची सांगड घालू शकले. स्पर्धा तसेच राष्ट्रीय संघाचे शिबीर यामुळे मला लेक्चरला बसणे शक्य होत नाही. परंतु प्रकल्प सादरीकरण, परीक्षा या मला ठरलेल्या वेळी द्याव्याच लागतात. नुकतीच इलेक्ट्रिक इंजिनीअरिंगच्या सहाव्या आणि अंतिम सत्राची मी परीक्षा दिली आहे. खेळाइतकाच अभ्यासही महत्त्वाचा आहे. दोन्ही गोष्टी सांभाळताना तारांबळही उडते, मात्र त्याला पर्याय नाही.
* खेळाडूने यश मिळवल्यावर त्याच्यावर शुभेच्छांचा, बक्षिसांचा वर्षांव होतो. मात्र त्याची तयारी सुरू असताना कुणाचीही साथ मिळत नाही. राज्य सरकारने तुला मदत पुरवली आहे का?
दुर्दैवाने नाही. ज्या राज्यात मी राहते, त्या सरकारचे प्रोत्साहन मिळाले असते तर फरक पडला असता. मात्र राष्ट्रकुलच्या तयारीच्या वेळी तसेच पदक जिंकल्यानंतरही राज्य सरकारने दखल घेतलेली नाही. गेल्या महिन्यात स्लोव्हेनियातील मारिबोर येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकात १० मीटर एअर रायफल प्रकारात मी कांस्यपदक पटकावले होते. आता राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. मात्र तरीही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. आर्थिक स्थैर्य असले तर खेळाकडे शांतचित्ताने लक्ष देता येते.