विश्वचषक काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरी भारतीय संघापुढे सर्वात मोठे आव्हान आहे ते तंदुरुस्तीचे. कारण एवढय़ा मोठय़ा स्पर्धेमध्ये जर खेळाडू तंदुरुस्त नसतील तर त्यांच्यामध्ये असलेली गुवणत्ता काहीच कामाची ठरणार नाही. सध्याच्या घडीला क्रिकेट जगतातील काही संघांची चांगली तयारी पाहायला मिळते. भारताचा संघ नक्कीच चांगला आहे, पण त्यांना या वेळी दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांचे मोठे आव्हान असेल. कारण विश्वचषकापूर्वीच्या स्पर्धामध्ये या संघांनी दमदार कामगिरी केली आहे. त्यांचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल आणि याचाच फायदा त्यांना विश्वचषकामध्ये होऊ शकतो.
भारतीय संघातील रवींद्र जडेजा आणि इशांत शर्मा सुरुवातीला दुखापतींनी त्रस्त होते, ते दुखापतीतून सावरताना दिसत असले तरी त्यांना सामन्याचा अनुभव नक्कीच नाही. इशांत शर्मा कसोटी मालिकेमध्ये खेळला होता, पण रवींद्र जडेजा गेल्या दोन महिन्यांपासून एकही सामने खेळलेला नाही. त्यामुळे त्याला थेट संघात घेऊन त्यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा करणे गैर असेल. रोहित शर्मा चांगल्या फॉर्मात असला तरी तोही दुखापतीने त्रस्त आहे. त्याची दुखापत गंभीर स्वरूपाची दिसत नसली तरी त्यालाही सावरण्यासाठी थोडा वेळ नक्कीच लागेल. कसोटी सामन्यांपेक्षा भारतीय संघाची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी उजवी आहे, पण तंदुरुस्तीशिवाय कोणताही संघ जिंकू शकत नाही.
कोणता संघ विश्वचषक जिंकेल, याबाबत आता मत व्यक्त करणे उचित ठरणार नाही. कारण विश्वचषक खेळताना सर्वात जास्त दडपण असते. भारतावर तर हे दडपण नक्कीच जास्त असेल, कारण ते गतविजेते आहेत आणि जेतेपद कायम राखण्याचे मोठे दडपण त्यांच्यावर असेल. फक्त चांगली कामगिरी करून सामना जिंकता येत नाही, तर थोडाफार दैवाचाही हातभार जिंकण्यासाठी लागतोच. त्याचबरोबर तिथले वातावरण, खेळपट्टी आणि त्यानुसार तुम्ही कशी संघनिवड करता, या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. भारताची फलंदाजी ही मुख्यत्वेकरून विराट कोहलीवर अवलंबून आहे, असे म्हणून चालणार नाही. कारण सर्वोत्तम ११ जणांचा संघ सामन्यासाठी निवडला जातो, त्यामुळे प्रत्येकावर संघाची भिस्त असते. एका खेळाडूची मोठी भमिका असू शकते, पण एकटय़ाच्या जिवावर सामना जिंकता येत नाही. भारत वगळता अन्य संघांबाबतही सध्याच्या घडीला भाष्य करता येणार नाही. जेव्हा विश्वचषकाला सुरुवात होईल, काही साखळीचे सामने पूर्ण होतील, त्यानंतर कामगिरीच्या जोरावर त्यांच्याबाबत बोलण्याला अर्थ असेल.
(शब्दांकन : प्रसाद लाड)

बिशनसिंग बेदी
माजी क्रिकेटपटू