बांगलादेश हा क्रिकेट क्षेत्रातील कमकुवत संघ म्हणून ओळखला जात असला तरी आजपर्यंतच्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी अनेक बलाढय़ संघांना पराभवाची चव चाखायला लावली आहे. त्यांच्या या अनपेक्षित विजयामुळे बाद फेरी किंवा सुपर एटचे अंदाजही साफ कोलमडले आहेत. १९७९पर्यंत बांगलादेशला k02एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत प्रवेशच मिळत नव्हता. १९७९मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी स्पर्धेत प्रवेश मिळाला. मात्र १९९९पर्यंत त्यांना पात्रता फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. ३१ मार्च १९८६ रोजी आशिया चषक स्पर्धेत ते पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामना खेळले. त्यांचा हा पहिलाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना होता. फुटबॉल हा खेळ लोकप्रिय असलेल्या बांगलादेशात हळूहळू क्रिकेटची लोकप्रियता वाढू लागली. १९९७मध्ये त्यांनी मलेशियात झालेली आयसीसी स्पर्धाजिंकून आपल्या भावी कामगिरीची झलक दिली व १९९९च्या विश्वचषक स्पर्धेच्या मुख्य फेरीची पात्रता पूर्ण केली. त्यांनी १२ संघांमध्ये नववे स्थान मिळवले. हे स्थान मिळवताना त्यांनी स्कॉटलंडवर विजय मिळविला पण त्याचबरोबर माजी विजेत्या पाकिस्तानला पराभूत करीत सनसनाटी कामगिरी केली. २०००मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे पूर्ण सदस्यत्व मिळाले. कसोटीत लागोपाठ २१ सामने (२००० ते २००२) व एकदिवसीय सामन्यांच्या स्वरूपात सलग २३ सामने (२००१ ते २००४) गमावण्याचा अनोखा विक्रम बांगलादेशच्या नावावर असला तरीही ‘धोकादायक संघ’ म्हणून त्यांची ख्याती आहे. २००३च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी सर्व सामने गमावले. मात्र २००७च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी गटसाखळीत भारताला पराभवाचा धक्का दिला तर सुपरएटमध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. २००९मध्ये त्यांनी वेस्ट इंडिजचा दौरा करताना दोन कसोटी सामने जिंकून आश्चर्यजनक कामगिरी केली. २०१०मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी क्रिकेटचे सुवर्णपदक मिळवत सनसनाटी यश संपादन केले. २०११मध्ये भारत व पाकिस्तान यांच्यासमवेत विश्वचषक स्पर्धेचे संयुक्त संयोजन करीत त्यांनी आपल्या सक्षम संयोजनशैलीची प्रचीती घडवली. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळाही ढाका येथे आयोजित करीत त्यांनी जगाला आपल्या सांस्कृतिक वैभवाचा प्रत्यय दिला. स्पर्धेनिमित्त ढाका येथे कायमस्वरूपी जागतिक दर्जाचे स्टेडियम साकारले गेले आहे. या स्पर्धेत त्यांनी आर्यलडवर मात केली, पण त्याचबरोबर इंग्लंडसारख्या अव्वल दर्जाच्या संघाला पराभूत करीत क्रिकेट समीक्षकांचे अंदाज फोल ठरवले.

बलस्थान व कच्चे दुवे
अनपेक्षित कामगिरी नोंदविण्याची क्षमता असलेला संघ म्हणूनच बांगलादेशची ओळख आहे. २००७ मध्ये सुपर एट संघात स्थान मिळविण्याचा पराक्रम त्यांनी केला आहे. अनुभवी व युवा तसेच अष्टपैलू खेळाडूंच्या समावेशामुळे समतोल संघ. कर्णधार मोर्तझा, तमिम, शकीब हसन, मुश्फीकर यांच्याकडे आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता आहे. १९ वर्षीय ताश्किन याने भारताविरुद्धच्या एक दिवसीय सामन्यात पाच बळी घेत आपल्या भावी यशाची झलक दाखविली आहे. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या पदार्पणातच हॅट्ट्रिक नोंदविणारा पहिला गोलंदाज होण्याची किमया ताजिउल याने केली आहे. कामगिरीत सातत्याचा अभाव हीच बांगलादेशपुढील मोठी समस्या आहे. एकदा खराब कामगिरी सुरू झाली की नीचांकी धावांमध्येच त्यांचा डाव कोसळतो.

अपेक्षित कामगिरी
बांगलादेश संघाला कसोटी सामन्यांमध्ये फारशी चमक दाखविता आलेली नाही. त्यांनी ८८ सामन्यांमध्ये केवळ सात सामने जिंकले आहेत. परंतु २९४ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी ८५ सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळविला आहे. तसेच ४१ पैकी ११ ट्वेन्टी-२० सामने त्यांनी जिंकले आहेत. मर्यादित षटकांच्या सामन्यांमधील त्यांची ही कामगिरी खूपच बोलकी आहे. त्यांना कमी लेखून चालणार नाही. अनपेक्षित विजय नोंदविण्याची मालिका ते यंदाही सुरू ठेवतील अशी आशा आहे.

संकलन : मिलिंद ढमढेरे