पवन नेगीची आश्चर्यकारक निवड; जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंडय़ालाही संधी
ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि आशिया चषकासाठी जाहीर करण्यात आलेल्या संघामध्ये अजिंक्य रहाणेची वर्णी लागली आहे. अजिंक्य आणि मनीष पांडे यांच्यामध्ये संघातील स्थानासाठी चुरस होती, यामध्ये अखेर अजिंक्यने बाजी मारली. युवा अष्टपैलू पवन नेगीची आश्चर्यकारकरीत्या संघात निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंडय़ा यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. युवराज सिंग आणि हरभजन सिंग या दोन्ही अनुभवी खेळाडूंवर निवड समितीने विश्वास दर्शवला असून त्यांनाही या संघांमध्ये स्थान देण्यात आले आहे. पण वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार यांना मात्र या संघांतून वगळण्यात आले आहे.
आशिया चषक स्पर्धा बांगलादेशमध्ये २४ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर भारतामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा ८ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीमध्ये रंगणार आहे.
नेगीने आतापर्यंत स्थानिक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. डावखुरा फिरकीपटू आणि उपयुक्त फलंदाजी तो करू शकतो.

पाटील म्हणाले..
* कुणी कधी निवृत्ती घ्यावी, याचा अधिकार आम्हाला नाही. विश्वचषक आणि आशिया चषकामध्ये भारताचे नेतृत्व करण्यासाठी धोनीच योग्य आहे.
* ऑस्ट्रेलियामध्ये मनीष पांडेने चांगली कामगिरी केली. त्याच्या नावाची चर्चाही या वेळी झाली. जेव्हा आम्ही संघाची निवड करतो, तेव्हा स्थानिक क्रिकेटमधील कामगिरी, तंदुरुस्ती यांच्यावर अधिक लक्ष देतो.
* अजून विश्वचषकाला किमान एक महिना आहे. या कालावधीमध्ये शमीबाबतचा निर्णय घेता येऊ शकतो. मला अशी आशा आहे की, या कालावधीमध्ये शमी तंदुरुस्त होऊन गोलंदाजीला सुरुवात करेल.

भारतीय संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युवराज सिंग, रवींद्र जडेजा, हार्दिक पंडय़ा, आर. अश्विन, हरभजन सिंग, जसप्रीत बुमरा, आशीष नेहरा, पवन नेगी आणि मोहम्मद शमी.