वर्ल्ड हॉकीलीग स्पर्धेच्या ५ व्या ६ व्या स्थानाकरता झालेल्या सामन्यात कॅनडाने भारतावर मात केली आहे. ३-२ अशा फरकाने मात करत कॅनडाने अखेरच्या सामन्यात भारताला धक्का दिला. मलेशियाविरुद्धच्या सामनाही भारतीय संघाने अखेरच्या क्षणांमध्ये गमावला होता. कॅनडाविरुद्धच्या सामन्यातही याचीच पुनरावृत्ती पहायला मिळाली. प्रतिस्पर्धी संघाने आघाडी घेतल्यानंतर ती भरुन काढत सामन्यात आघाडी घ्यायला भारतीय संघ नेहमी कमी पडतो. भारताचे आघाडीचे खेळाडू अशा वेळी लगेच दडपणाखाली जातात आणि सामन्यावरची पकड गमावून बसतात, आज कॅनडाविरुद्धच्या सामन्यात याचाच प्रत्यय आला.

पाकिस्तानला ६-१ ने हरवल्यानंतर अखेरच्या सामन्यात भारतीय संघ कॅनडावर सहज मात करेल अशी आशा होती. मात्र प्रत्यक्ष सामन्यात भारतीय संघाचे सगळे फासे उलटे पडले. सामन्याच्या तिसऱ्या मिनीटाला कॅनडाच्या जॉन्सन गॉर्डनने पेनल्टी कॉर्नरवर गोल झळकावत भारताला पहिला धक्का दिला. मात्र भारतीय संघ या धक्क्यातून तुलनेने लवकर सावरला. रुपिंदरपाल सिंहच्या अनुपस्थितीत ड्रॅगफ्लिकींगची जबाबदारी सांभाळणाऱ्या हरमनप्रीतने ७ व्या आणि २२ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

आजच्या सामन्यात कॅनडाच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंच्या तोडीस तोड खेळ केला. पाकिस्तानच्या सामन्यात गोलचा पाऊस पाडणारी भारताची आघाडी फळी या सामन्यात मात्र थंडावलेली पहायला मिळाली. पहिल्या तिन्ही सत्रात भारताचे आघाडीचे खेळाडू गोल करण्यासाठी झुंजताना पहायला मिळाले. हरमनप्रीतचा अपवाद वगळता कोणत्याही भारतीय खेळाडूला गोल करता आला नाही.

कॅनडाने मात्र प्रत्येक सत्रात आपला खेळ उंचावला. २-१ अशा पिछाडीवरुन केगन पेरेराने ४० व्या मिनीटाला मैदानी गोल करत कॅनडाला बरोबरी साधून दिली. यानंतर जॉन्सन गॉर्डनने परत ४४ व्या मिनीटाला भारताच्या बचावपटूंना चकवत बॉल गोलपोस्टमध्ये झाडत कॅनडाला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या सत्रात भारताला सामन्यात बरोबरी साधण्याची संधी मिळाली होती, मात्र पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात हरमनप्रीतला अपयश आलं. त्यातच मनप्रीत सिंहचे काही फटके कॅनडाचा गोलरक्षक अँटोनी किंडलरने सुरेख अडवत भारताला सामन्यात बरोबरी करण्याची संधी दिली नाही. या विजयामुळे कॅनडाने या स्पर्धेत ५ वा क्रमांक पटकावला असून भारताला ६ व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे.

याआधी झालेल्या सामन्यात भारताने कॅनडाला ३-० असं हरवलं होतं. मात्र या स्पर्धेत आपल्यापेक्षा तुलनेने कमी दर्जाच्या संघासोबत खेळताना भारतीय संघाचं गोष्टी ग्राह्य धरणं महागात पडत गेलंय. उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाने धक्का दिल्यानंतर आता कॅनडाविरुद्धच्या निकालाने या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालंय. त्यामुळे आगामी वर्ल्ड हॉकीलीग फायनल आणि विश्वचषक स्पर्धेआधी भारताला या समस्येवर काम करावं लागणार आहे.