ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील कुस्ती खेळातील सहभाग वाढवण्यासाठी भारतीय मल्लांना शुक्रवारपासून इस्तंबूल येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पध्रेत अखेरची संधी मिळणार आहे. पात्रता स्पर्धा तीन दिवस चालणार असून त्यामध्ये १४ भारतीय खेळाडू नशीब आजमावत आहेत. प्रत्येक गटातील पहिले दोन स्पर्धकच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार असल्यामुळे भारतीय मल्लांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

गीता (५८ किलो), बबिता (५३ किलो), सुमित (१२५ किलो फ्रीस्टाइल) व राहुल आवारे (५७ किलो फ्रीस्टाइल) या चार मल्लांवर भारतीय हौशी कुस्ती महासंघाने बेशिस्त वर्तनाबद्दल तात्पुरती बंदी घातली आहे. त्यामुळे रिओ ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याच्या त्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.

महिला कुस्तिगीर विनेश फोगटचे (४८ किलो) वजन ४०० ग्रॅम्सने जास्त भरल्यामुळे तिला पहिल्या पात्रता स्पर्धेतून बाद करण्यात आले होते. वजन कमी करीत ऑलिम्पिक प्रवेशिका मिळवून दाखवू अशी तिने खात्री दिल्यानंतर तिला ताकीद देऊन पुन्हा पात्रता स्पर्धेत भाग घेण्याची संधी देण्यात आली आहे. भारताच्या एकाही महिला खेळाडूला यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे विनेशवर भारताच्या खूप आशा आहेत. गीता व बबिता यांच्याऐवजी साक्षी मलिक व ललिता यांना पात्रता फेरीत संधी देण्यात आली आहे. साक्षी व किरण यांनी नुकत्याच झालेल्या आशियाई पात्रता स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केली होती.

पुरुषांच्या फ्रीस्टाइलमध्ये मौसम खत्री याच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. ग्रीको-रोमन विभागात भारतीय मल्लांची कामगिरी आजपर्यंत निराशाजनकच झाली आहे. मात्र हरदीपने आशियाई पात्रता स्पर्धेतून ऑलिम्पिक तिकीट निश्चित करीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. महाराष्ट्राच्या नरसिंग यादवने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवीत फ्रीस्टाइलच्या ७४ किलो गटात ऑलिम्पिक कोटा निश्चित केला आहे. आशियाई पात्रता स्पर्धेत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त याने फ्रीस्टाइलमधील ६५ किलो गटात ऑलिम्पिक तिकीट निश्चित केले आहे. ५७ किलो गटात संदीप तोमरने नुकताच ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला आहे.

भारतीय संघ

पुरुष – फ्रीस्टाइल : गोपाळ यादव (८६ किलो), मौसम खत्री (९७ किलो), हितेंदर (१२५ किलो)

ग्रीको-रोमन : रवींदर सिंग (५९ किलो), सुरेश यादव (६६ किलो), गुरप्रितसिंग (७५ किलो), रवींदर खत्री (८५ किलो), नवीनकुमार (१३० किलो)

महिला – फ्रीस्टाइल : विनेश (४८ किलो), ललिता (५३ किलो), साक्षी मलिक (५८ किलो), शिल्पी शेरॉन (६३ किलो), गीतिका जाखर (६९ किलो), किरण कुमारी (७५ किलो).