पाकिस्तान सरकारची संघाला परवानगी; विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी
पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत सहभागासाठी पाकिस्तान सरकारने आपल्या संघाला परवानगी दिली आहे. मात्र या स्पध्रेदरम्यान संघाला विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
गेले काही आठवडे याबाबतची चर्चा ऐरणीवर होती. मात्र ८ मार्चपासून सुरू होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पध्रेत सहभागासाठी सरकारने हिरवा कंदील दिला आहे, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी सांगितले.
‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकात भाग घेण्यासाठी आमच्या सरकारने परवानगी दिली आहे, याचा मला अतिशय आनंद होतो आहे. सावधगिरीची उपाययोजना म्हणून भारतात पाकिस्तानी संघाला विशेष सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी, अशी विनंती आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) केली आहे,’’ असे खान यांनी सांगितले.
‘‘पाकिस्तानने विश्वचषकातून माघार घेतली असती तर आयसीसीकडून त्यांना दंड ठोठावण्यात आला असता. सरकारने परवानगी न दिल्यास पाकिस्तानचे ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात यावे, अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही आयसीसीकडे सादर केला होता,’’ असे खान या वेळी म्हणाले.
‘‘क्रिकेटरसिकांच्या व्हिसासाठी खास व्यवस्था करण्यात यावी,’’ अशी अपेक्षा खान यांनी व्यक्त केली.