आघाडी घेतल्यानंतरही खेळावरील नियंत्रण गमावत सामन्यात पराभव स्वीकारणे, हे भारतीय हॉकी संघाचे वैशिष्टय़ मानले जाते. आर्यलडविरुद्ध १-० अशी आघाडी घेणाऱ्या भारताला १-२ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे जागतिक महिला हॉकी लीगमध्ये (उपांत्य टप्पा) भारतीय संघ आठव्या क्रमांकावर फेकला गेला.

उत्कंठापूर्ण सामन्यात १५व्या मिनिटाला गुरजित कौरने पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल केला आणि भारताचे खाते उघडले. त्यानंतर पेनल्टी स्ट्रोकसह अनेक हुकमी संधी मिळूनही भारताला आणखी गोल करता आले नाहीत. सामन्याच्या ४७व्या मिनिटाला कॅथरीन मुल्लनने पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत आर्यलडचा पहिला गोल केला आणि १-१ अशी बरोबरी साधली. या धक्क्यातून भारतीय बचावरक्षक सावरत नाही, तोच आर्यलडच्या लिझी कोल्वीनने पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलात करीत संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी कायम ठेवत त्यांनी हा सामना जिंकला.

सामन्याच्या ४७व्या मिनिटापासून शेवटपर्यंत आर्यलडच्या खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व गाजवले. दोन मिनिटांत दोन गोल करीत त्यांनी सामन्यास कलाटणी दिली. त्यांचे दोन गोल झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र त्याचा फायदा त्यांना मिळाला नाही.